बडय़ा उद्योगसमूहांच्या हितांचे रक्षण करण्यातच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना स्वारस्य आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे त्यांचे दुर्लक्ष आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी मंगळवारी अमेठी मतदारसंघात प्रस्तावित फूड पार्कच्या प्रश्नावर केली.
अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्याची पाहणी करण्यासाठी इराणी येथे आल्या होत्या. राहुल गांधी जेव्हा प्रथम अमेठीत बोलले तेव्हा त्यांनी उद्योगसमूहांचा प्रश्न मांडला. अमेठीतील शेतकऱ्यांचा प्रश्न त्यांनी मांडला नाही, असे इराणी म्हणाल्या.
जिल्हा प्रशासनातील दस्तऐवजांची पाहणी केल्यास असे निदर्शनास येते की, २०१० ते २०१४ या कालावधीत काँग्रेसने जमीनच उपलब्ध करून दिली नाही. नैसर्गिक वायूसाठी जी मदत देणे गरजेचे होते तीही देण्यात आली नाही, असेही त्या म्हणाल्या.
अमेठीतील प्रस्तावित ‘फूड पार्क’ प्रकल्प रद्द
नवी दिल्ली :कंपनीच्या प्रवर्तकांनी आवश्यक त्या अटींची पूर्तता न केल्याने अमेठी लोकसभा मतदारसंघातील प्रस्तावित फूड पार्क प्रकल्प रद्द करण्यात आल्याचे स्पष्टीकरण मंगळवारी सरकारने दिले. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या मतदारसंघातील फूड पार्कचा प्रश्न उपस्थित केला होता.
नैसर्गिक वायू उपलब्ध नसल्याने या फूड पार्कच्या प्रवर्तक कंपनीने हा प्रकल्प पूर्ण करण्यास असमर्थता दर्शविली, असे अन्नप्रक्रियामंत्री हरसिमरत कौर यांनी लोकसभेत सांगितले. डिसेंबर २०१२ मध्ये गेल्या सरकारने नैसर्गिक वायू देण्यास नकार दिला होता, असेही मंत्री म्हणाल्या. हरसिमरत कौर यांनी या बाबत सविस्तर निवेदन केले तेव्हा काँग्रेसच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.
अमेठीतील प्रस्तावित शक्तिमान फूड पार्क प्रा. लि. हा प्रकल्प रद्द करण्यात आला. हा प्रकल्प रद्द केल्याबद्दल काँग्रेसच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smriti irani visits amethi attacks rahul on food park issue
First published on: 13-05-2015 at 12:30 IST