पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी नामीबीया देशातून ८ चित्ते भारतात आणण्यात आली आहे. या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात आलं आहे. या चित्त्याचं संरक्षण करण्यासाठी आता श्वान पथक तैनात करण्यात येणार आहे. यासाठी इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्स (ITBP) च्या राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात ‘जर्मन शेफर्डस’ जातीच्या कुत्र्यांना प्रशिक्षण दिलं जात आहे. हे केंद्र हरियाणातील पंचकुला येथे आहे.

या श्वान पथकाच्या माध्यमातून नुकतंच नामीबीया देशातून भारतात आणलेल्या चित्त्यांना संरक्षण पुरवलं जाणार आहे. हे श्वान पथक शिकाऱ्यांपासून चित्त्यांना असलेला धोका ओळखतील आणि नवीन वातावरणात आलेल्या चित्त्यांचं रक्षण करतील. त्याचबरोबर वाघाची कातडी, हाडे, हत्तीचे दात, रेड सँडर्स आणि इतर बेकायदेशीर वन्यजीव उत्पादने शोधण्याचे प्रशिक्षणही या कुत्र्यांना दिलं जाईल. या कुत्र्यांना वर्ल्ड वाइड फंड फॉर नेचर इंडिया आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस फोर्सद्वारे प्रशिक्षण दिले जात आहे.

स्निफर डॉगला प्रशिक्षण देतानाचा व्हिडीओ

हेही वाचा- ७० खून आणि २५० दरोडे; एकेकाळचे कुख्यात डाकू रमेश सिंग सिकरवार बनले ‘चित्ता मित्र’, आफ्रिकेतून आणलेल्या चित्यांचं करणार रक्षण

या श्वान पथकाला पुढील सात महिने प्रशिक्षण दिलं जाणार आहे. ‘स्निफर डॉग’ म्हणून आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात केल्यानंतर या श्वान पथकाला मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये तैनात केलं जाणार आहे. हे स्निफर डॉग पुढील वर्षी एप्रिलपर्यंत चित्त्यांसह इतर प्राण्यांचं संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे प्रशिक्षित होतील.