जैश-ए-मोहंमद संघटनेच्या दहशतवाद्यांशी लढताना जखमी झालेले भारतीय लष्करातील ‘राष्ट्रीय रायफल्स‘चे जवान पांडुरंग महादेव गावडे यांना आज वीरमरण आले. दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या पांडुरंग गावडे यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी प्राण सोडला. शहीद पांडुरंग गावडे मूळचे सिंधुदुर्गातल्या आंबोली येथे राहणारे होते.
जम्मू-काश्मीरमधील सीमावर्ती भागातील कुपवाडा जिल्ह्यात काल जैश-ए-मोहंमदच्या अतिरेक्यांशी भारतीय जवानांची सुमारे नऊ तास चकमक चालू होती. दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देत पाच दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी यमसदनी धाडले होते. या चकमकीत दहशतवाद्यांशी लढताना राष्ट्रीय रायफल्सचे पांडुरंग महादेव गावडे, अतुल कुमार व इतर एक जवान गंभीर जखमी झाले. या हल्ल्यात गावडे गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे संरक्षण खात्याच्या अधिका-यांनी सांगितले.
पांडुरंग यांच्या चेहऱ्यावर गोळी लागली होती तर अतुल यांच्या उजव्या खांद्याला गोळी लागली होती. या दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत प्रथम ड्रगमुला येथील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर श्रीनगर येथील रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले होते. तिथे उपचार घेत असतानाच आज पांडुरंग गावडे यांची प्राणज्योत मालवली.
पाच वर्षापूर्वी झाले होते भरती
पांडुरंग हे सावंतवाडी तालुक्यातील आंबोली-मुळवंदवाडीतील होते. पाच वर्षांपूर्वीच ते लष्करात भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा अवघा दोन ते तीन महिन्यांचा आहे. पांडुरंग यांच्या निधनाने गावडे कुटुंब तसेच संपूर्ण आंबोलीवरच शोककळा पसरली आहे
संग्रहित लेख, दिनांक 22nd May 2016 रोजी प्रकाशित
कुपवाड्यातील चकमकीत महाराष्ट्राचा वीर पांडुरंग गावडे शहीद
शहीद पांडुरंग गावडे मूळचे सिंधुदुर्गातल्या आंबोली येथे राहणारे होते.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali
Updated:

First published on: 22-05-2016 at 16:03 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Soldier pandurang gawade injured in drugmulla gunfight succumbs