Reddit Viral Post: राज्यसह देशभरात नुकतेच बारावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. आपल्या पालकांना निकालाची माहिती दिल्यानंतर येणाऱ्या प्रतिक्रियांचा प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव येत असतो. अशात एका विद्यार्थ्यांने त्याच्या वडिलांना बारावीच्या निकालाची माहिती दिल्यानंतर त्यांच्या प्रतिक्रियेने हा विद्यार्थी आश्चर्यचकीत झाला आहे.
लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रेडिटवर एका बारावीच्या विद्यार्थ्याचा वडिलांशी निकालाबाबत केलेल्या संवादाचा स्क्रीनशॉट व्हायरल झाला आहे. याला रेडिटवर १,००० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या स्क्रीनशॉटमध्ये मुलगा त्याच्या वडिलांना त्याला बारावीच्या परीक्षेत ८४ टक्के गुण मिळाल्याचे सांगतो, ज्याला त्याचे वडील गोड आणि एका शब्दात उत्तर देतात, “गूड.” दरम्यान, जरी हे सर्वोत्कृष्ट गुण नसले तरी बहुतेक बोर्ड परीक्षांमध्ये ८४ टक्के गुण हे चांगले मानले जातात.
या बाप-लेकांमधील संवाद वाचल्यानंतर अनेक रेडिट युजर्स भावूक झाले. यावेळी एका युजरने पालक आणि त्याच्या बारावीच्या गुणांची तुलना करत सांगितले की, त्याच्यावर पालकांसारखी सर्वोत्तम कारगिरी करण्याचा दबाव होता. त्याचे गुण त्याच्या वडिलांइतके उत्तम नव्हते, त्यामुळे त्याचावर सतत कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा दबाव असायचा.
पुढे या युजरने सांगितले की, बारावीचा निकाल लागला त्यावेळी त्याचे वडील मुंबईला होते, तर त्याची आई घरी होती. धाडस एकवटून त्याने पहिल्यांदा आईला गुण सांगण्याचा निर्णय घेतला. गुण सांगितल्यानंतर त्याला त्याच्या आईच्या शांत आणि संयमी प्रतिक्रियेचे आश्चर्य वाटले. उलट, ती काहीही बोलली नाही. नंतर, शांत आवाजात ती म्हणाली, “चांगले गुण आहेत, हे गुण काही वाईट नाहीत.”
सुमारे एक तासानंतर, त्याला त्याच्या वडिलांचा व्हिडिओ कॉल आला. यावेळी तो वडिलांशी बोलण्यासाठी घाबरला होता. तरीही, त्याने कॉलला उचलला. यावेळी त्याच्या वडिलांनी त्याला रागावले नाही. त्यांच्या चेहऱ्याव हास्य होते. त्याचे वडील त्यांच्या ऑफिस रूममध्ये आरामात बसले होते. ते म्हणाले “बेटा, बारावी उत्तीर्ण झाल्याबद्दल खूप शुभेच्छा”. हे इतके अनपेक्षित होते की, यामुळे मुलगा अवाक झाला. या क्षणी रेडिट युजरला शैक्षणिक गुणांपेक्षा कुटुंबात असलेले प्रेम, पाठिंबा आणि स्वीकृती महत्त्वाची असल्याचे लक्षात आले.