हरयाणातील भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट यांच्या मृत्यूप्रकरणी रोज नवनवी माहिती समोर येत आहे. या संशयित मृत्यूप्रकरणी खुनाच्या गुन्ह्याव्यतिरीक्त ड्रग्ज प्रकरणी नवा गुन्हा दाखल करण्यात आला असून गोवा पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे याआधीही पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलेले आहे.

हेही वाचा>>> सोनाली फोगटच्या शरीरावर जखमा आढळल्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून हत्येचा उलगडा; पोलिसांची पीएसह साथीदाराला अटक

मिळालेल्या माहितीनुसार फोगट यांच्या मृत्यू होण्याच्या आदल्या रात्री त्या ज्या रेस्टॉरंटमध्ये पार्टी करत होत्या त्या रेस्टॉरंचा मालक एडविन न्युन्स आणि ड्रग्ज डीलर दत्तप्रसाद गावकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. याआधी पोलिसांनी हरियाणामधील भाजपा नेत्याचे सहकारी सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांना १० दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

हेही वाचा>>> लक्षवेधी सजावट, मिठाई वाटप अन्…; मुलासह रुग्णालयामधून घरी परतली सोनम कपूर, अनिल कपूर यांनी नातवाचं केलं स्वागत

सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांना गुरुवारी पोलिसांनी बेड्या ठोकल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्यांनी गावकर या ड्रग्ज डीलरकडून ड्रग्ज आणले होते, असे कबूल केल्याचे म्हटले जात आहे. ‘एनडीटीव्ही’ तसे वृत्त दिले आहे.

दरम्यान, सोनाली फोगट मृत्यूप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत २५ पेक्षा जास्त लोकांची चौकशी केली आहे. यामध्ये फोगट यांनी पार्टी केलेले रेस्टॉरंट, फोगट थांबलेल्या रिसॉर्टचे कर्मचारी तसेच फोगट यांना मृत जाहीर केलेल्या रुग्णालयाचे डॉक्टर आणि फोगट यांचा वाहनचालक यांचा समावेश आहे.