राजा रघुवंशीची हत्या होऊन आज महिना पूर्ण झाला. दरम्यान सोनम रघुवंशी राजाची हत्या घडवून आणल्यानंतर इंदूरमधल्या ज्या फ्लॅटवर येऊन लपली होती त्या प्रकरणात पोलिसांनी प्रॉपर्टी डीलर आणि वॉचमनला अटक केली आहे. त्यामुळे आता राजाच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या ही सात झाली आहे. सिलोम जेम्सला रविवारी अटक करण्यात आली. खरंतर सिलोम जेम्स हा भोपाळला पळून जाण्याच्या बेतात होता पण त्याला पोलिसांनी अटक केली. तसंच इमारतीच्या वॉचमनलाही पोलिसांनी अटक केली आहे. बलवीर अहिरवर असं या वॉचमनचं नाव आहे. राजाची हत्या केल्यानंतर सोनम ज्या इमारतीत लपली होती त्याच इमारतीचा हा वॉचमन आहे. तो सुतारकामही करतो अशी माहिती पोलिसांनी दिली.
बलवीर हा कृष्ण विहार सोसायटीत वॉचमन म्हणून काम करतो
बलवीर हा कृष्ण विहार सोसायटीत वॉचमन म्हणून काम करतो आणि तो छोटंमोठं सुतारकामही करतो आम्ही त्याला अटक केली आहे अशी माहिती पोलिसांनी एएनआयला दिली. पोलिसांनी बलवीर आणि सिलोम जेम्स या दोघांनाही न्यायालयात हजर केलं होतं. त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
सिलोम जेम्सकडे सोनमने दिलेल्या पेटीत काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिलोम जेम्सकडे सोनमने एक पेटी दिली होती. त्या पेटीत दागिने, लॅपटॉप आणि राज कुशवाहाने जे हत्यार आणलं होतं ते असू शकतं. ही पेटी सिलोमने नष्ट केली आहे. त्यातल्या वस्तू कुठे आहेत? याची चौकशी आता पोलीस करत आहेत. सिलोम जेम्सने पोलिसांना त्या ठिकाणी नेलं होतं जिथे त्याने ही पेटी जाळली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिथे त्यांना लॅपटॉप किंवा दागिने जाळल्याच्या कुठल्याही खुणा किंवा अवशेष मिळाले नाहीत. त्यामुळे आता पेटीतलं सामान नेमकं कुठे आहे? याची चौकशी सुरु आहे. विशाल चौहानने १७ हजार रुपये प्रति महिना भाडे तत्त्वावर हा फ्लॅट घेतला होता. २३ मे रोजी म्हणजेच आजपासून महिन्याभरापूर्वी राजा रघुवंशीची हतया करण्यात आली. त्याचा मृतदेह २ जून रोजी आढळून आला होता. राजाची हत्या कशी करायची हे सोनम आणि तिचा बॉयफ्रेंड राज कुशवाहा या दोघांनी आधीच कट करुन ठरवलं होतं.
अल्बर्ट पीडीने दिलेल्या माहितीमुळे सोनम आली पोलिसांच्या रडारवर
अल्बर्ट पीडी हा शिलाँगचा टुरिस्ट गाईड आहे. त्याने पोलिसांना महत्त्वाची माहिती दिली. पोलिसांना त्याने सांगितलं की सोनम आणि राजा यांच्यासह तिघांना त्याने पाहिलं होतं. नोंग्रियाट ते मावलखियाट या ठिकाणी हे तिघंही राजा आणि सोनम यांच्यासह तीन हजार पायऱ्या चढून गेले होते. गाईडने दिलेल्या माहितीनुसार राजा आणि इतर तिघे हे समोर चालले होते तर सोनम ही या चौघांच्या मागे होती. सगळे हिंदीत बोलत होते. अल्बर्टने पोलिसांना हेदेखील सांगितलं की त्याला हिंदी समजत नाही. पण काहीतरी गडबड आहे असा संशय त्याला आला होता. यानंतर पोलीस आणखी सावध झाले आणि त्यांनी या हत्येमागे सोनम तर नाही ना? हा पैलू तपासण्यास सुरुवात केली. ज्यानंतर सोनम रघुवंशीच या घटनेच्या मागे असल्याची बाब पोलिसांच्या लक्षात आली. मेघालय पोलिसांनी यासंदर्भातल्या मोहिमेला ऑपरेशन हनिमून असं नाव दिलं आहे.