Raja Raghuvanshi Murder Case : इंदोरमधील एक दाम्पत्य बेपत्ता झाल्यानंतर आता या प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. सोनम आणि तिचा पती राजा रघुवंशी हे २२ मे रोजी शिलाँगमधून अचनाक बेपत्ता झाले होते. त्यानंतर २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह आढळून आल्याची माहिती समोर आली होती. या संपूर्ण घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. राजा रघुवंशीचा मृतदेह आढळून आल्यानंतर सोनम रघुवंशी बेपत्ता झाली होती. त्यामुळे अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. यानंतर अखेर आज गाझिपूरमध्ये सोनम एका ढाब्यावर आढळून आल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं.

दरम्यान, राजा रघुवंशीची हत्या सोनमने केली का? किंवा राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणात तिचा सहभाग आहे का? यासंदर्भात तिची चौकशी पोलिसांकडून करण्यात येणार आहे. मात्र, या संपूर्ण घटनेबाबत आता राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशीच्या कुटुंबियांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. आता राजा रघुवंशीच्या आईने प्रतिक्रिया देत राजा रघुवंशीच्या हत्या प्रकरणात जर सोनमचा सहभाग असेल तर तिला कठोर शिक्षा झाली पाहिजे, असं उमा रघुवंशी यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआयच्या माध्यमातून करण्यात आली पाहिजे, अशी मागणी देखील केली आहे.

राजा रघुवंशीच्या आईने काय म्हटलं?

उत्तर प्रदेशातील गाजीपूरजवळ सापडलेल्या सोनम रघुवंशीबाबत राजा रघुवंशीची आई उमा रघुवंशी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “लग्नापूर्वी त्या दोघांनी (सोनम आणि राजा) एकत्र वेळ घालवावा असं आम्हाला वाटत होतं. कारण त्या दोघांमध्ये काही बोलणं झालं असतं तर एकमेकांच्या मनात काही असतं तर ते कळालं असतं. पण यासाठी सोनमच्या आईचा नकार होता. लग्नानंतर ती आमच्या घरी काही दिवस राहिली. या घटनेबाबत आम्हाला आधी काहीही समजलं नाही. मात्र, सोनमने जर राजा रघुवंशीची हत्या केली असेल तर तिला कठोर शिक्षा व्हावी”, असं राजा रघुवंशीच्या आईने म्हटलं आहे.

“तिचा इतर कोणाशी संबंध आहे याबाबत मला माहिती नाही. या प्रकरणात सीबीआय चौरशी व्हायला पाहिजे. तर तिने ही हत्या केली नसेल तर तशी माहिती चौकशीत समोर येईल. मी तिला माझ्या मुलीप्रमाणे मानलं होतं. आता जे तीन पण लोक पकडले आहेत त्यांची देखील आधी चौकशी झाली पाहिजे. फिरण्यास जाण्यासाठी सोनमने तिकिटे बूक केले होते. पण येण्याबाबत बूक केले नव्हते. आम्ही तिला मनापासून स्वीकारलं होतं. जर सोनम या प्रकरणात सहभागी असेल तर तिला शिक्षा होईल”, अशी प्रतिक्रिया राजा रघुवंशीच्या आईने दिली आहे.