दीप्तिमन तिवारी, बशरत मसूद,
लेह, श्रीनगर : पर्यावरणवादी कार्यकर्ते व लडाख राज्यासाठीच्या आंदोलनात अग्रभागी असलेल्या सोनम वांगचुक यांना शुक्रवारी लेहमध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक करण्यात आली. लेहमध्ये बुधवारी आंदोलनात हिंसाचार झाला होता. त्यासाठी वांगचुक जबाबदार असल्याचा आरोप केंद्र सरकारने केला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. विविध राजकीय पक्षांनी या अटकेचा निषेध केला आहे.

लडाखला राज्याचा दर्जा आणि घटनेतील सहावे परिशिष्ट लागू करावे, या मागणीसाठी गेले काही दिवस लेहमध्ये आंदोलन सुरू आहे. लडाखमधील विविध संघटनांच्या शिखर संस्थेचे (लेह ॲपेक्स बॉडी) वरिष्ठ सदस्य असलेले वांगचुक हे ‘कारगिल लोकशाही आघाडी’च्या (केडीए) मदतीने हे आंदोलन करीत आहेत. बुधवारी लेहमध्ये या आंदोलनात जाळपोळ झाली होती. यामध्ये वाहनांना आग लावण्यात आली तसेच भाजप कार्यालय पेटवून देण्यात आले होते. हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू तर ९० जण जखमी झाले.

या घटनेला केंद्राने वांगचुक यांना जबाबदार धरले. पाठोपाठ गुरुवारी वांगचुक यांनी स्थापन केलेल्या ‘स्टुडन्ट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मूव्हमेंट ऑफ लडाख’चा परवानाही रद्द केला होता. आता शुक्रवारी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. लेहमध्ये शुक्रवारी पत्रकार परिषद घेणार असल्याचे वांगचुक यांनी जाहीर केले होते. मात्र त्यापूर्वीच त्यांना ताब्यात घेण्यात आले. केंद्र सरकारने आश्वासन पाळले नाही त्यामुळे समस्या निर्माण झाल्या, असा आरोप जम्मू व काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी केला. लडाखमध्ये आंदोलनादरम्यान झालेल्या चार जणांच्या मृत्यू प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी शुक्रवारी काँग्रेसने केली आहे.

लेहमध्ये तणावपूर्ण शांतता

लेह शहरात शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी संचारबंदी कायम ठेवण्यात आली. शहरात कुठेही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दरम्यान, नागरिकांनी जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत असल्याच्या तक्रारी अनेक ठिकाणी केल्या. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने लेह परिसरातील मोबाइल, इंटरनेट सेवाही बंद केली आहे.

वांगचुक यांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक

‘कोणत्याही कारणाशिवाय सोनम वांगचुक यांना एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली जात आहे’, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांच्या पत्नी गीतांजली यांनी शुक्रवारी दिली. ‘हिमालयीन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह्ज, लडाख’च्या (एचआयएएल) सह-संस्थापक असलेल्या गीतांजली यांनी पतीच्या अटकेचा निषेध केला. पोलिसांनी कारवाईदरम्यान घराची मोडतोड केल्याचा दावाही त्यांनी केला.

आम्हाला जशी आश्वासने दिली तशीच त्यांनाही देण्यात आली. केंद्राला आश्वासनांची पूर्तता का करता येत नाही? हे समजत नाही. –ओमर अब्दुल्ला, मुख्यमंत्री, जम्मू-काश्मीर