बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात १२ तारखेला ४९ जागांसाठी मतदान होत आहे. त्याचा प्रचार शनिवारी थंडावला. जवळपास एक कोटी ३५ लाखांवर मतदार हक्क बजावतील अशी अपेक्षा आहे. सत्ताधारी संयुक्त जनता दलाने गेल्या वेळी यातील २९ जागा जिंकल्याने त्यांच्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा आहे. तर यातील १३ जागा भाजपने जिंकल्या होत्या. राज्यातील दक्षिण-पुर्वेकडील १० जिल्ह्यांचा यात समावेश आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या वैयक्तिक लोकप्रियतेच्या जवळपास पोहचणाहा एकही नेता विरोधकांकडे नाही. त्यातच भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. त्याचा लाभ उठवण्याचा नितीशकुमारांचा प्रयत्न आहे. त्यामुळे बाहरी (पंतप्रधान नरेंद्र मोदी) यांच्या पेक्षा बिहारी म्हणून मला निवडून द्या अशी साद नितीशकुमारांनी पहिल्या टप्प्याचा प्रचार संपताना घातली आहे. मोदी गुजरातमध्ये मुख्यमंत्रीपदी असताना गुजरातमध्ये मांसाहाराच्या उत्पादनात २३४ टक्के वाढ झाल्याचा दावा नितीशकुमारांनी करत याच मुद्दय़ावरून उत्तर देण्याचा प्रयत्न चालवला आहे. पंतप्रधानांनी लालूप्रसाद यादव यांना लक्ष्य करत ‘जंगलराज’चा आरोप करत नितीशकुमारांची कोंडी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. बिहरमध्ये पंतप्रधानांच्या सभांची संख्या पाहता येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका त्यांच्याच नेतृत्वात लढवल्या जातील अशी खिल्ली उडवली आहे. एकूणच बिहारचा संघर्ष मोदी विरुद्ध नितीशकुमार असा आहे. उत्तर प्रदेशातील दादरी येथील घटनेनंतर गोहत्या बंदीच्या मुद्दय़ावरून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. प्रचारातील आक्रस्ताळेपणावरून आतापर्यंत नेते व कार्यकर्त्यांवर ३७ एफआयआरची नोंद झाली आहे यावरून प्रचाराचा स्तर लक्षात येतो. निवडणूक आयोगालाही त्यावरून राजकीय पक्षांना तंबी द्यावी लागली. प्रचारात सभ्यता सोडू नका अशा शब्दांत कान टोचावे लागले.
सैतान, महासैतान असे शब्द प्रयोगही प्रचारात वापरण्यात आले. त्यामुळे बिहारच्या खुर्चीसाठी संग्रमात नेते इरेला पेटले आहेत. प्रचारात विकासाचे नाव घेतले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र भावनिक मुद्दय़ांच्या आधारे मतदारांना वळवण्याचा प्रयत्न सुरु आहे. दूरचित्रवाणी तसेच समाजमाध्यमे यांच्या वापरामुळे लोकांना घरबसल्या हे पहायला मिळत आहे. जनमत चाचण्यांनीही वेगवेगळे कल दिले आहेत. काहींनी नितीकशकुमार यांच्या संयुक्त जनता दलाच्या महाआघाडीला तर काहींनी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीची सरशी होईल असे भाकित वर्तवले आहे. त्यामुळे नेमके चित्र स्पष्ट होत नाही. मात्र दोन आघाडय़ांमध्ये कमालीची चुरस आहे. त्यामुळे छोटय़ा गटांनाही महत्त्व आले आहे. राज्यातील ३० ते ३५ जागांवर विजयी उमेदवारांच्या मतांतील अंतर एक ते दोन टक्के असल्याने शेवटच्या क्षणी काय होईल त्याचा अंदाज वर्तवणे अवघड आहे.
– ह्रषिकेश देशपांडे
संग्रहित लेख, दिनांक 11th Oct 2015 रोजी प्रकाशित
सत्ताबाजार : आरोप-प्रत्यारोपांची राळ
बिहारी म्हणून मला निवडून द्या अशी साद नितीशकुमारांनी पहिल्या टप्प्याचा प्रचार संपताना घातली आहे.
Written by चैताली गुरवguravchaitali

First published on: 11-10-2015 at 01:01 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Special article on bihar election by hrishikesh deshpande part two