रॉयटर्स, न्यूयॉर्क

अमेरिकेमध्ये शनिवारी ‘नो किंग्ज’ रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अमेरिकेमध्ये अनेक छोटी-मोठी शहरे आणि उपनगरांत २,६०० ठिकाणी या ‘नो किंग्ज’ आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे हुकूमशाहीसारखे वागणे आणि प्रशासनातील भ्रष्टाचार याचा आंदोलनात निषेध करण्यात आला. आंदोलनामध्ये सर्व वयोगटातील नागरिक सहभागी होते.

आंदोलनामध्ये ट्रम्प राबवत असलेल्या धोरणांना विरोध करण्यात आला. न्यूयॉर्कमधील ‘टाइम्स स्क्वेअर’ येथे गर्दीचा उच्चांक होता. पाच ठिकाणी एक लाखाहून अधिक नागरिकांनी शांततापूर्ण मोर्चे काढले. पोलिसांनी या ठिकाणी कुणालाही अटक केली नाही. बोस्टन, फिलाडेल्फिया, अटलांटा, डेनवर, शिकागो, सिएटल येथेही हजारोंच्या संख्येने गर्दी झाली होती. लॉस एंजेलिससह इतर ठिकाणीही नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला होता. सॅन दिएगो येथेही २५ हजारांहून अधिक नागरिकांनी आंदोलनात सहभाग घेतला होता.

मी राजा नाही : ट्रम्प

‘ते माझा राजा म्हणून उल्लेख करीत आहेत. मी राजा नाही. डेमोक्रॅटिक पक्षाने कायमस्वरुपी सत्तेबाहेर राहावे. त्यामुळे अध्यक्ष म्हणून डेमोक्रॅटिक पक्षाचे कल्याणकारी उपक्रम मला बाजूला ठेवता येतील, अशी प्रतिक्रिया अध्यक्ष ट्रम्प यांनी आंदोलनापूर्वी दिली होती.

हुकूमशाहीला विरोध

अमेरिकेतील ‘शटडाऊन’मुळे अनेक सरकारी उपक्रम आणि सेवा ठप्प पडल्या आहेत. या मुद्दय़ावरून सध्या काँग्रेस आणि न्यायालयादरम्यान सुरू असलेला संघर्ष एकाधिकारशाहीकडे झुकणार आहे, असे आंदोलनाच्या आयोजकांचे म्हणणे आहे.

आम्ही राजेशाहीत नसून, आम्हाला कुठलाही राजा नाही. शांततापूर्ण निदर्शने करण्याचा आम्ही आमचा हक्क बजावत आहोत. – आंदोलक