स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून आणखी एका रणजीपटू क्रिकेटरला अटक करण्यात आली. बाबूराव यादव असे त्याचे नाव आहे. या प्रकरणी याआधी अटक करण्यात आलेल्या राजस्थान रॉयल्सच्या एस. श्रीशांत, अजित चंडिला, अंकित चव्हाण आणि अन्य काही बुकींच्या पोलिस कोठडीत आणखी वाढ करण्याची मागणीही मंगळवारी न्यायालयाकडे करण्यात येणार आहे. या तिघांची पोलिस कोठडी आज संपणार आहे.
दिल्ली पोलिसांनी यादवला सोमवारी रात्री दिल्लीतून अटक केली. त्याचा आणि अजित चंडिला यांचा संबंध असल्याचे पोलिस तपासात दिसून आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. चंडिला याची सुनील यादव नावाच्या बुकीशी ओळख यादव यानेच करून दिली होती. या प्रकरणावरून आतापर्यंत पोलिसांनी एकूण १८ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये आयपीएलमधील तीन क्रिकेटपटू, चार माजी क्रिकेटपटू आणि ११ बुकींचा समावेश आहे.
श्रीशांत, चव्हाण आणि चंडिला यांच्यासह अन्य बुकींना मंगळवारी दिल्लीतील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यांची पोलिस कोठडीची मुदत आज संपणार आहे. पोलिस या तिन्ही क्रिकेटपटूंबरोबर ८ बुकींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी करणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spot fixing former ranji player held
First published on: 21-05-2013 at 12:55 IST