स्पॉट फिक्सिंगच्या जाळ्यात आणखी काही क्रिकेटपटू अडकले असून, पोलिस त्याचा तपास करीत असल्याची माहिती दिल्लीचे पोलिस आयुक्त नीरजकुमार यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिली. पोलिसांच्या रडारवर असलेले हे सर्व क्रिकेटपटू भारतीयच असून, ते राजस्थान रॉयल्सच्या संघातील नसल्याचेही नीरजकुमार यांनी स्पष्ट केले. 
दिल्ली पोलिस करीत असलेल्या तपासात काही नवीन बुकींची नावेही समोर आली आहेत. दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत ११ बुकींना अटक केली आहे. त्यांच्याशिवाय इतरही काही बुकी स्पॉट फिक्सिंग करीत असल्याचे तपासात आढळले. हेच बुकी आयपीएलमधील इतर संघातील काही खेळाडूंच्या साह्याने स्पॉट फिक्सिंग करीत असल्याचा आमचा संशय आहे. या संदर्भात लवकरच पोलिस कारवाई करतील, असे नीरजकुमार यांनी सांगितले.
पोलिसांनी गेल्या आठवड्यात केलेल्या कारवाईमध्ये जेवढे मोबाईल, कॉम्प्युटर जप्त केले, त्यामधून मिळालेल्या माहितीनुसार आयपीएल सामन्यांवर बेटिंग घेण्याचे एक मोठे रॅकेटच असल्याचे दिसून आले आहे. केवळ भारतातच नाही, तर परदेशातूनही बेटिंग घेतले जात असल्याचे आणि हवालाच्या साह्याने पैशांचे व्यवहार केले गेल्याचे पोलिस तपासात आढळल्याचे नीरजकुमार यांनी सांगितले.