पीटीआय, कोलंबो

श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी जपानसोबत आर्थिक सहकार्य आणि भारताशी प्रादेशिक एकात्मता मजबूत करण्याच्या महत्त्वावर भर दिला. श्रीलंका दिवाळखोरीतून बाहेर पडू पाहत असताना भारताबरोबरचे संबंध अधिक दृढ करण्यावरही त्यांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

‘शाश्वत भविष्यासाठी सक्षम ग्लोबल साऊथ’ या विषयसूत्रीअंतर्गत आयोजित तिसऱ्या ‘व्हॉईस ऑफ ग्लोबल साऊथ समिट’च्या प्रमुखांना संबोधित करताना विक्रमसिंघे बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद पार पडली.

हेही वाचा >>>भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे निधन

भारत-श्रीलंका संबंधांवर बोलताना विक्रमसिंघे यांनी दोन्ही राष्ट्रांमधील सामायिक दृष्टीकोनावर जोर दिला. यामुळे श्रीलंका आणि भारत यांच्यात विविध क्षेत्रांमध्ये मजबूत एकात्मता निर्माण होईल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. विक्रमसिंघे यांनी श्रीलंकेच्या आशियातील आर्थिक भागीदारीचा विस्तार करण्याच्या धोरणात्मक वचनबद्धतेवरही प्रकाश टाकला. श्रीलंका भारताशी जवळचे आर्थिक एकात्मता आणि जपान ते भारतापर्यंत विस्तारित आर्थिक सहकार्यासाठी प्रयत्न करत आहे, असे त्यांच्या कार्यालयाने निवेदनात म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रीलंकेच्या अलीकडच्या आर्थिक संकटात मोदी आणि भारतातील जनतेने दिलेल्या पाठिंब्याबद्दल विक्रमसिंघे यांनी आभार व्यक्त केले. गेल्या दोन वर्षांत आव्हानांना सामोरे जाण्यात आणि दिवाळखोरीतून बाहेर पडण्यास भारताने महत्त्वाची भूमिका बजावली, असे विक्रमसिंंघे यांनी या वेळी मान्य केले.