देशात सर्वाधिक ९२ पुरस्कार महाराष्ट्राला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्र सरकारच्या स्वच्छता पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ९२ पुरस्कार पटकावत देशात अव्वल स्थान मिळवले आहे. शंभरहून अधिक नागरी स्थानिक स्वराज्य संस्था असलेल्या महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला देशातील अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्वच्छ राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. देशात स्वच्छतेत प्रथम आलेल्या छत्तीसगडला मात्र ६७ पुरस्कार मिळाले आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावरील महाराष्ट्राने सर्वाधिक ९२ पुरस्कार पटकावले आहेत. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाने शनिवारी या वर्षी केलेल्या ‘स्वच्छ सर्वेक्षणा’चे निकाल जाहीर केले.

‘स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार, २०२१’च्या ‘सर्वात स्वच्छ शहर’ श्रेणीमध्ये सुरत आणि विजयवाडा यांनी अनुक्रमे दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले. इंदूर आणि सुरतने ‘स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२१’मध्ये आपले अव्वल स्थान कायम राखले असले तरी, नवी मुंबईने मागील वर्षीचे तिसरे स्थान गमावले असून यंदा या शहराला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मात्र ‘कचरामुक्त शहर श्रेणीत’ नवी मुंबईने इंदूर, सुरत, नवी दिल्ली शहर, अंबिकापूर, म्हैसूर, नोएडा, विजयवाडा आणि पाटण या नऊ  शहरांसह पंच तारांकित मानांकन मिळवले आहे.

‘सफाईमित्र सुरक्षा आव्हान’ श्रेणीत इंदूर, नवी मुंबई, नेल्लोर आणि देवास अव्वल कामगिरी करणारे शहरे ठरली आहेत. १० ते ४० लाख लोकसंख्येच्या श्रेणीत नवी मुंबईने देशातील ‘सर्वांत स्वच्छ मोठे शहर’ म्हणून पहिले स्थान पटकावले आहे.

महाराष्ट्रातील विटा हे एक लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेले सर्वांत स्वच्छ शहर ठरले आहे, त्यानंतर लोणावळा आणि सासवड यांचा क्रमांक लागतो. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी येथे एका कार्यक्रमात केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकासमंत्री हरदीप सिंग पुरी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान केले.

देशव्यापी स्वच्छता सर्वेक्षणात, २८ दिवसांत ४,३२० शहरांचा समावेश करण्यात आला आहे, ४.२ कोटी पेक्षा जास्त लोकांनी त्यांचा अभिप्राय नोंदवला.

मुंबईतील घनकचरा व्यवस्थापनाचे आव्हान

सुमारे ४७५ चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या मुंबई महानगरात दीड कोटीहून अधिक लोकसंख्या वास्तव्यास आहे. मुंबईत जवळपास दोन हजार किलोमीटर लांबीचे रस्ते आहेत. इतर शहरांमधून दररोज नोकरी-व्यवसाय निमित्ताने कोट्यवधी नागरिक मुंबईत ये-जा करतात. ही सर्व व्याप्ती लक्षात घेतली तर दैनंदिन घनकचरा व्यवस्थापन करण्याचे अवाढव्य लक्ष्य महानगरपालिका प्रशासनासमोर असते. वार्षिक सरासरी सुमारे ६,१०० मेट्रिक टन घनकचऱ्याचे व्यवस्थापन केले जाते. हे व्यवस्थापन अधिकाधिक सुलभ आणि पर्यावरणस्नेही व्हावे म्हणून पालिकेने अनेक पावले उचलली आहेत. तसेच लोकसहभाग देखील वाढवला आहे. या सर्व कामगिरीची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला आहे.

नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे शनिवारी झालेल्या समारंभात, गृहनिर्माण आणि नगर विकास खात्याचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी हा पुरस्कार प्रदान केला. मुंबई महानगरपालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त संगीता हसनाळे, उपायुक्त भाग्यश्री कापसे, प्रमुख अभियंता अशोक यमगर, कार्यकारी अभियंता (स्वच्छ भारत अभियान) अनघा पडियार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

मुंबई पालिकेची उत्कृष्ट कामगिरी

मुंबई : घनकचरा व्यवस्थापनातील नाविन्यपूर्ण आणि उत्कृष्ट कामगिरीबद्दल मुंबई महानगरपालिकेला प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. चाळीस लाखांपेक्षा अधिक लोकसंख्येच्या मोठ्या शहरांच्या श्रेणीत हा पुरस्कार मुंबई महापालिकेने पटकावला.

राज्यांत छत्तीसगड, शहरांत इंदूर पहिले

देशातील ‘सर्वांत स्वच्छ शहर’ हा बहुमान मध्य प्रदेशातील इंदूरने पाचव्यांदा मिळवला आहे, तर छत्तीसगडने देशातील सर्वांत स्वच्छ राज्याचा आपला दर्जा कायम राखला आहे. सुरत आणि विजयवाडा ही देशातील अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची शहरे ठरली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीला ‘स्वच्छ गंगा शहर’ हा पुरस्कार लागोपाठ दोनदा मिळाला आहे.

स्वच्छतेच्या बाबतीत महाराष्ट्र प्रथमपासूनच अग्रस्थानी आहे. आता तर महापालिका श्रेणीमध्ये  प्रमुख तीन पुरस्कार महाराष्ट्राने पटकावले आहेत. सर्व अधिकारी, नागरिक आणि नगरसेवकांचे अभिनंदन. – उद्धव ठाकरे</strong>, मुख्यमंत्री

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: State tops in cleanliness maharashtra has the highest number of 92 awards in the country akp
First published on: 21-11-2021 at 01:39 IST