मंगळाच्या पृष्ठभागाचा ‘नासा’कडून अभ्यास

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने मंगळावर पाठवलेल्या इनसाइट यानाने  यांत्रिक बाहू व कॅमेरा यांच्या मदतीने सेल्फी छायाचित्र घेतले असून त्यात एकूण अकरा प्रतिमांचे ते संकलन आहे असे सांगण्यात आले.

क्युरिऑसिटी रोव्हर मोहिमेतही याच पद्धतीने छायाचित्रे काढण्यात आली होती. नंतर ती एकत्र जुळवण्यात आली होती. या स्वप्रतिमेत (सेल्फी) लँडरचे सौर पंख व सगळी वैज्ञानिक उपकरणेही दिसत आहेत.

इनसाइट लँडर मंगळावर खडकाळ भागात उत्खननाचे काम सुरू करणार असून हे यान २६ नोव्हेंबरला मंगळावर उतरले आहे. इनसाइट लँडर मोहिमेतील वैज्ञानिकांनी सांगितले की, सेल्फी छायाचित्र चार बाय दोन मीटर आकाराचे असून त्यात इनसाइट यानाची सगळी पार्श्वभूमीही दिसत आहे.  एकूण ५२ छायाचित्रे जुळवून हे छायाचित्र तयार करण्यात आले आहे.

येत्या काही आठवडय़ात यानाचे नेमके स्थान ठरवण्यात येणार आहे. त्यानंतर सिस्मोमीटर व हीट फ्लो उपकरण चालू करण्यात येईल. अर्धा इंचापेक्षा जास्त जाडीच्या खडकावर ही उपकरणे लावली जाणार नाहीत. नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीचे मुख्य संशोधक ब्रुस बॅनडेट यांनी सांगितले की, या  भागात खडक, टेकडय़ा व छिद्रे नाहीत त्यामुळे हा भाग उपकरणांना सुरक्षित आहे. इन्साइट यान हे एलीसियम प्लॅनिशिया विवरात उतरले असून तेथे खडकाळ भाग कमी आहे. अपेक्षेपेक्षाही यानाच्या अवतरणाचे ठिकाण चांगले ठरले आहे त्यामुळे तेथे यानावरील उपकरणे व्यवस्थित ठेवून काम करता येतील. या भागात पाच मीटर खोल खणून तेथील पृष्ठभागाचा अभ्यास केला जाणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Study of mars surface nasa
First published on: 13-12-2018 at 02:53 IST