राजनैतिक अधिकाऱ्यास प्रथमच परराष्ट्र मंत्रीपद;  जयशंकर यांनी सूत्रे स्वीकारली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी दिल्ली : माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्रीपदाचा कार्यभार शुक्रवारी स्वीकारला असून, राजनैतिक अधिकारी परराष्ट्र मंत्री होण्याची ही दुर्मीळ घटना आहे.

जयशंकर हे चीन व अमेरिका संबंधविषयक तज्ज्ञ असून ते पाकिस्तानशी संबंधांबाबतच्या धोरणात नेमके काय बदल करतात याची उत्कंठा वाढली आहे.  जयशंकर हे माजी परराष्ट्र सचिव आहेत, त्यामुळे राजनैतिक अधिकाऱ्याने मंत्रिपद भूषवण्याची ही पहिलीच वेळ आहे.

परराष्ट्र सचिव पदावरून निवृत्त होऊन सोळा महिने झाले असतानाच त्यांनी मंत्रिपदाची सूत्रे घेतली असून भारताचा जगातील प्रभाव व प्रतिमा उंचावण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. जी २०, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, ब्रिक्स या आंतरराष्ट्रीय मंचावर त्यांना लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. अमेरिका, रशिया, फ्रान्स,जपान, युरोपीय महासंघ यांच्याशी व्यापार व संरक्षण संबंध सुधारण्यास ते प्राधान्य देतील अशी अपेक्षा आहे.  भारताचे चीनशी संबंध सुधारण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. २०१७ मध्ये डोकलाम पेचप्रसंगात दोन्ही देशांचे सैन्य ७२ दिवस एकमेकांपुढे उभे ठाकले असताना त्यांनी परराष्ट्र सचिव म्हणून मोठी कामगिरी बजावली होती. चीन आफ्रिका खंडात आपले बाहू फैलावत असताना त्याला स्पर्धा निर्माण करावी लागणार आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाचे स्थायी सदस्यत्व, अणुपुरवठादार गटाचे सदस्यपद मिळवणे ही दोन आव्हाने त्यांच्यापुढे आहेत. आखाती देशात संबंध वाढवणे, तसेच हायड्रोकार्बनची रेलचेल असलेल्या मध्य आशियातही संपर्क वाढवणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. जयशंकर हे भारतातील सामरिक विश्लेषक के. सुब्रमण्यम यांचे पुत्र असून भारत -अमेरिका अणुकरार घडवण्यात जयशंकर यांचा मोठा सहभाग होता. २००५ पासून या कराराची प्रक्रिया सुरू होती, त्यानंतर २००७ मध्ये मनमोहन सिंग सरकारच्या काळात हा करार झाला. जयशंकर यांनी अमेरिका व चीनमध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केले आहे. १९७७ च्या तुकडीतील ते परराष्ट्र सेवा अधिकारी असून लडाखमधील देसपांग व डोकलाम हे वाद हाताळण्यात त्यांचा मोठा वाटा होता. ते सिंगापूर व जेकोस्लोव्हाकियात भारताचे राजदूत होते. निवृत्तीनंतर ते टाटा समूहाचे जागतिक कंपनी कामकाज अध्यक्ष होते.  जयशंकर हे स्टीफन्स कॉलेजचे पदवीधर असून ते राज्यशास्त्रात एमए आहेत. नंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधावर पीएचडी केली. त्यांचा विवाह क्योको जयशंकर यांच्याशी झालेला असून त्यांना दोन मुलगे व एक मुलगी आहे. त्यांना २०१९ मध्ये ‘पद्मश्री’ सन्मान देण्यात आला होता.

‘बिमस्टेक’ नेत्यांशी मोदींची चर्चा

नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी श्रीलंकेचे अध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना, नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली आणि भूतानचे पंतप्रधान लोटे त्सेरिंग यांच्याशी परस्परसंबंध वृद्धिंगत करण्याबाबत स्वतंत्रपणे चर्चा केली. पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर मोदी यांनी बांगलादेशचे अध्यक्ष अब्दुल हमिद आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रवीण जगन्नाथ यांच्याशीही विस्तृत चर्चा केली. मोदी यांच्या शपथविधी समारंभासाठी परदेशी नेते भारत दौऱ्यावर आले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subrahmanyam jaishankar is new minister of external affairs
First published on: 01-06-2019 at 02:39 IST