कोरेगाव भीमा हिंसाचारा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मानव अधिकार कार्यकर्त्या आणि वकिल सुधा भारद्वाज यांना ३० ऑगस्टपर्यंत नजर कैदेत ठेवण्यात येणार आहे. पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने त्यांना पुण्यास नेण्यास मनाई केली असून ३० ऑगस्टपर्यंत नजर कैदेत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कोरेगाव भीमा हिंसाचार आणि माओवाद्यांशी कनेक्शन असल्याच्या आरोपावरुन पाच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. सुधा भारद्वाज त्यापैकी एक आहेत.

पुणे पोलिस पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत नसल्याचा आरोप सुधा भारद्वाज यांच्या वकिलाने केला. मंगळवारी संध्याकाळी न्यायदंडाधिकाऱ्याने सुधा भारद्वाज यांचा ट्रानसिट जामीन नाकारल्यानंतर त्यांना पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाने दिलासा दिला. न्यायदंडाधिकारी ट्रानसिट रिमांडबद्दल निर्णय घेत नाही तो पर्यंत त्यांना पुण्याला घेऊन जात येणार नाही असा आदेश उच्च न्यायालयाने दिला.

उच्च न्यायालयाचा आदेश असतानाही पुणे पोलिसांनी अटक केली. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे हे उल्लंघन आहे असे सुधा भारद्वाज यांच्या वकिलाने सांगितले. सुधा भारद्वाज या आदिवासींचे वेगवेगळे खटले लढवत असून त्यांच्या कार्यासाठी त्या तळागाळात ओळखल्या जातात. फरीदाबाद येथील घरातून त्यांना अटक करण्यात आली.

त्यांच्या अटकेवर बोलताना प्रसिद्ध लेखक आणि इतिहास तज्ञ रामचंद्र गुहा म्हणाले कि, महात्मा गांधींच्या चरित्राचा लेखक म्हणून मला एका गोष्टीची पूर्ण खात्री आहे. आज महात्मा गांधी जिवंत असते तर त्यांनी वकिलीचा कोट अंगावर चढवून ते सुधा भारद्वाज यांचा बचाव करण्यासाठी कोर्टात उभे राहिले असते. मोदी सरकारने अजून महात्मा गांधींना अटक केलेली नाही असं समजून मी हा विचार करत आहे असे गुहा यांनी त्यांच्या टि्वटमध्ये म्हटले आहे.