मध्यप्रदेशात मोठी दुर्घटना घडली आहे. येथे भारतीय हवाई दलाचे दोन विमानं कोसळली आहेत. सुखोई-३० आणि मिराज २००० ही विमानं कोसळली आहेत. या अपघातानंतर बचावकार्य सुरु आहे. दोन्ही विमानांची हवेत धडक झाल्याचं सांगण्यात येत आहे. पण, हवाई दलाकडून अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

शनिवारी सकाळी मध्यप्रदेशातील मोरेना येथे सुखोई-३० आणि मिराज २००० ही हवाई दलाची दोन विमानं कोसळली. दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर येथील हवाई तळावरून उड्डाण केलं होतं. सुखोई-३० मध्ये २ वैमानिक आणि मिराज २००० मध्ये एक वैमानिक होता, अशी माहिती एएनआयने दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाचे अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, दोन्ही विमानांची हवेत धडक झाली की नाही, याची हवाई दलाकडून चौकशी करण्यात येणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीडीएस अनिल चौहान यांनी हवाई दलाचे प्रमुख व्ही.आर. चौधरी यांच्याकडून अपघाताची संपूर्ण माहिती घेत आहेत, असं संरक्षण दलाच्या सूत्रांनी सांगितलं.

राजस्थानमध्येही विमानाचा अपघात

राजस्थानमधील भरतपूरमध्ये भारतीय हवाई दलाचं एक विमान कोसळलं आहे. येथील पिंगोरी रेल्वे स्टेशनजवळ हे विमान कोसळलं आहे. विमान कोसळल्यानंतर त्याने पेट घेतला. या विमानाने आग्र्याहून उड्डाण केलं होतं. पण, भरतपूरजवळ आल्यावर कोसळलं. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.