रामदेव बाबा यांच्या पतंजली या कंपनीकडून त्यांच्या उत्पादनासंदर्भात करण्यात येणारी जाहिरात आणि त्याचवेळी ॲलोपॅथीला खोटे ठरवण्याचा प्रयत्न यामुळे मागील काही वर्षांपासून रामदेव बाबांची कंपनी सतत वादात राहिली आहे. औषधांच्या परिणामकारकतेचे आणि रोगमुक्तीचे दावे करणाऱ्या पतंजलीने हमीचे उल्लंघन केल्याबद्दल संताप व्यक्त करून पतंजलीच्या जाहिरातींवर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यापाठोपाठ सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण यांना सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. अशीच नोटीस रामदेव यांनाही पाठवण्यात आली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने रामदेव आणि बाळकृष्ण यांना दोन आठवड्यांच्या आत न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. नुकत्याच झालेल्या सुनावणीवेळी हे दोघेही हजर न झाल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच दोघांनाही गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे.
औषध उपचारांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती दाखवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने पतंजली आयुर्वेद या रामदेव यांच्या कंपनीला अक्षरशः झापलं आहे. तसेच या फसव्या जाहिरातींच्या प्रकरणी न्यायालयाने २७ फेब्रुवारी २०२४ रोजी केलेल्या सुनावणीवेळी बाळकृष्ण आणि रामदेव यांना तीन आठवड्यांच्या आत उत्तर मागितलं होतं. परंतु, बाळकृष्ण किंवा रामदेव यांनी न्यायालयाला कोणतंही उत्तर पाठवलं नाही. तसेच त्यांच्यापैकी कोणीही न्यायालयात हजर झालं नाही. यामुळे न्यायमूर्तींनी दोघांवरही तीव्र नाराजी व्यक्त केली.
न्यायालयात नेमकं काय झालं?
सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूचे वकील उपस्थित होते. यावेळी पतंजली आयुर्वेदची बाजू मांडणारे वकील मुकुल यांना न्यायमूर्तींनी विचारलं की, तुमच्याकडून अद्याप याप्रकरणी कोणत्याही प्रकारचं उत्तर का नाही आलं? तुमच्या आशिलांना न्यायालयात हजर राहण्यास सांगाय. आम्ही रामदेव आणि बाळकृष्ण यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देत आहोत.
यासह न्यायालयाने आयुष मंत्रालयालाही फटकारलं. मंत्रालयाला सवाल केला की, तुम्हीदेखील याप्रकरणी तुमचं उत्तर एक दिवस आधी का पाठवलं नाही? आयुष मंत्रालयाने न्यायालयाला सांगितलं की, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आणखी थोडा वेळ हवा आहे. दरम्यान, न्यायालयाने रामदेव यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटलं आहे की, तुम्ही न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी तुमच्याविरोधात आम्ही खटला का चालवू नये?
नेमकं प्रकरण काय?
पतंजली आयुर्वेदने १० जुलै २०२२ रोजी ‘द हिंदू’ या वृत्तपत्रात अर्ध्या पानावर औषधांबाबत जाहिरात दिली होती. “अॅलोपॅथीकडून होणारा अपप्रचार : स्वत:ला व देशाला फार्मा आणि वैद्यक क्षेत्रातून होणाऱ्या अपप्रचारापासून वाचवा”, अशा मथळ्याखाली ती जाहिरात प्रकाशित झाली होती. त्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने पतंजली आयुर्वेद विरोधात एक रिट याचिका दाखल केली होती. त्यात पतंजली आयुर्वेदकडून अॅलोपॅथी आणि आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतींबाबत अपप्रचार केला जात असल्याचं म्हटलं होतं. पतंजली आयुर्वेदकडून ड्रग्ज अँण्ड अदर मॅजिक रेमेडिज अॅक्ट, १९५४ आणि ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे थेट उल्लंघन केले जात असल्याचा दावा देखील इंडियन मेडिकल असोसिएशनने केला होता. तसेच करोना साथीच्या वेळी रामदेव यांनी अॅलोपॅथीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांचा उल्लेख त्यांच्या रिट याचिकेत केला होता. याप्रकरणी न्यायालयात सुनावणी चालू आहे.