मणिपूरमध्ये जमावाने दोन महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ४ मे २०२३ रोजी मणिपूरमधील थौबाल जिल्ह्यात ही घटना घडली. यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. मात्र, दोन महिने उलटूनही अद्याप आरोपींना अटक झालेली नाही. या संतापजनक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी निवेदन जारी करत पोलीस आरोपींचा शोध घेत असल्याचं सांगितलं. दरम्यान, याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

“दोन महिलांना नग्न करून धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ही घटना ४ मे २०२३ रोजी घडली. यानंतर सशस्त्र अज्ञात आरोपींविरोधात अपहरण, सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे”, अशी माहिती पोलीस अधीक्षक के. मेघचंद्र सिंह यांनी सांगितलं.

सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारला मणिपूरमध्ये महिलांना विवस्त्र करून धिंड काढल्याच्या केल्याच्या व्हिडिओंविरोधात पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, “आम्ही सरकारला कारवाई करण्यासाठी थोडा वेळ देऊ, अन्यथा आम्हीच पावले उचलू. कालचा व्हिडीओ पाहून आम्ही व्यथित झालो आहोत. या प्रकाराबाबात आम्ही चिंता व्यक्त करतो. सरकारने पुढे येऊन पावलं उचलली पाहिजेत आणि कारवाई केली पाहिजे.”

हेही वाचा >> मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढत सामूहिक बलात्कार, पोलीस म्हणाले, “या प्रकरणाचा…”

“अशा हिंसाचाराविरोधात गुन्हेगारांवर गुन्हा दाखल करण्यासाठी सरकारने उचललेल्या पावलांची माहिती न्यायालयाला दिली पाहिजे. माध्यम आणि व्हिज्युअलमधून जे दिसत आहे ते घटनाविरोधी आहे, असं चंद्रचूड म्हणाले. “हिंसाचाराचे साधन म्हणून महिलांचा वापर करून मानवी जीवनाचा भंग करणे घटनात्मक लोकशाहीच्या विरोधात आहे”, असंही चंद्रचूड यांनी म्हटलंय.

“याप्रकरणी केंद्र आणि राज्य सरकारने काय पावले उचलली याची माहिती द्या. संबंधितांवर कारवाई करण्यासाठी आम्ही थोडावेळ देऊ. अन्यथा आम्हालाच पावले उचलावी लागतील. हे प्रकरण आम्ही शुक्रवारी सुनावणीसाठी घेऊ”, असंही चंद्रचूड यांनी स्पष्ट केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.