महिला आता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून सर्वच क्षेत्रांमध्ये पुढे येत असल्या, तरी देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये महिलांना पुरुषांच्या बरोबरीने प्रतिनिधित्व मिळत नसल्याचं चित्र दिसू लागलं आहे. विशेषत: देशातील उच्च न्यायालये आणि खुद्द सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश पदांबाबत हे चित्र अधिक प्रकर्षाने जाणवत असताना याविरोधात सर्वोच्च न्यायालयातील महिला वकिलांच्या संघटनेने सर्वोच्च न्यायालयातच याचिका दाखल केली आहे. आकडेवारीमध्ये देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये पुरुष न्यायाधीशांच्या तुलनेत महिला न्यायाधीश अगदीच कमी संख्येत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे महिला वकिलांच्या संघटनेनं न्यायव्यवस्थेचे दरवाजे ठोठावले आहेत! सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुकीमध्ये पात्र महिला वकिलांचा देखील विचार व्हायला हवा, अशी मागणी या याचिकेमधून करण्यात आली आहे. या याचिकेच्या सुनावणीवेळी भारताचे सरन्यायाधीश यांनी “एक महिला सरन्यायाधीशपदी बसण्याची वेळ आली आहे”, अशी टिप्पणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय सांगते आकडेवारी?

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात आजच्या घडीला एकूण २५ उच्च न्यायालये आहेत. मात्र, त्यामध्ये फक्त ८१ महिला न्यायाधीश आहेत. तर दुसरीकडे पुरूष न्यायाधीशांची संख्या तब्बल १ हजार ०७८ इतकी आहे. सर्वोच्च न्यायालयाचा विचार करता एकूण २८ पुरुष न्यायाधीशांच्या तुलनेत देशाच्या सर्वोच्च न्यायालयात फक्त एकच महिला न्यायाधीश आहेत. या तफावतीवर बोट ठेवतच महिला वकिलांच्या संघटनेनं ही याचिका केली आहे.

“महिलांकडूनच येतो नकार”

दरम्यान, याचिकेच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी काही निरीक्षणं नोंदवली. “उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती याविषयी सांगतात की महिला वकिलांना न्यायाधीश पदाविषयी विचारणा केली असता त्यांच्याकडूनच नकार येतो. घरातील जबाबदाऱ्यांचं कारण त्यासाठी दिलं जातं”, असं न्यायमूर्ती शरद बोबडे म्हणाले.

सरन्यायाधीशपदी रमणा यांची नियुक्ती

महिला वकिलांचा आक्षेप!

दरम्यान, यावर महिला वकिलांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. “अनेक पुरुष वकील त्यांची प्रॅक्टिस चांगली चालू आहे आणि कमाई कमी करून घ्यायची नाही म्हणून देखील न्यायाधीश बनण्यासाठी नकार देतात. पण त्यामुळे पुरूष न्यायाधीशांची संख्या कुठे कमी झाली?” असा सवाल मुंबईतील अ‍ॅड. वीणा गौडा यांनी केला आहे. “न्यायव्यवस्थेने महिला वकिलांच्या वयोमर्यादेकडे देखील गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. लग्न, बाळंतपणाच्या रजा या महिला वकिलांच्या करिअरचा महत्वाचा भाग असतात. जोपर्यंत त्यांची प्रॅक्टिस व्यवस्थित होते, तोपर्यंत काही उच्च न्यायालये त्यांचं न्यायाधीश होण्यासाठी वय जास्त असल्याचं मानतात”, असा आक्षेप दिल्लीतील महिला अ‍ॅड. अनिंदिता पुजारी यांनी नोंदवला आहे.

दरम्यान, देशातील इतर क्षेत्रांमध्ये महिलांना समान हक्क मिळण्यासाठी लढा होत असताना देशाच्या न्यायव्यवस्थेमध्येच महिलांना समान हक्कांसाठी लढा द्यावा लागत असल्याचं चित्र समोर येऊ लागलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Supreme court judgment on women advocate association plea pending cases pmw
First published on: 16-04-2021 at 14:30 IST