Supreme Court Lawyer CJI Gavai Shoe Attack : सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असताना एका वकिलाने सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकांनी प्रसंगावधान साधत या वकिलाला अडवलं आणि न्यायालयाबाहेर नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा वकील सरन्यायाधीशांवरील संताप व्यक्त करत त्यांच्याजवळ पोहोचला. त्यानंतर तो बूट काढू लागला. तो बूट फेकून मारणार इतक्यात सुरक्षारक्षकांनी त्याला पकडलं आणि बाहेर नेलं. ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा स्वरुपाच्या घोषणा देखील या वकिलाने यावेळी दिल्या.

अलीकडेच विष्णू मंदिरासंदर्भातील एका प्रकरणाची सुनावणी करत असताना सरन्यायाधीश गवई याचिकाकर्त्याला म्हणाले होते की “तुमची तक्रार असेल तर तुम्ही भगवान विष्णूकडे जा.” त्यावर काही लोकांनी, हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेत सरन्यायाधीशांवर टीका केली होती. याच वक्तव्याचा संताप व्यक्त करत एका वकिलाने आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी चालू असताना थेट सरन्यायाधीशांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

न्यायालयात नेमकं काय घडलं?

हा वकील सरन्यायाधीशांच्या दिशेने धावून गेला आणि तो पायातला बूट काढू लागला. त्याचवेळी न्यायालयातील सुरक्षारक्षक त्याच्या दिशेने धावले. तो वकील बूट काढून सरन्यायाधीशांच्या दिशेने भिरकावणार इतक्यात सुरक्षारक्षकांनी त्याला पकडलं आणि न्यायालयाबाहेर नेलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. “सनातन का अपमान… नहीं सहेगा हिंदुस्तान…” अशा घोषणा या वकिलाने यावेळी दिल्या. त्याला न्यायालयाबाहेर नेत असताना देखील त्याची घोषणाबाजी चालू होती.

सरन्यायाधीश काय म्हणाले?

दरम्यान, वकिलाने घातलेल्या या गोंधळानंतरही सरन्यायाधीशांनी न्यायालयाचं कामकाज थांबू दिलं नाही. त्यांनी कार्यवाही चालू ठेवण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले, “हे सगळं पाहून कोणीही विचलित होऊ नका. मी देखील विचलित झालो नाही. अशा घटनांनी मला काहीच फरक पडत नाही.”

सरन्यायाधीशांच्या दिशेने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाचं नाव राकेश किशोर असं आहे.

विष्णू मंदिरासंदर्भातील ते प्रकरण काय होतं?

मध्यप्रदेशमधील प्रसिद्ध खजुराहो मंदिर परिसरातील जावरी मंदिरातील सात फूट उंच भगवान विष्णूची शीर नसलेली मूर्ती हटवून त्या ठिकाणी भगवान विष्णूची नवी मूर्ती बसवावी अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात १७ सप्टेंबर रोजी फेटाळून लावली होती. न्यायालयाने स्पष्ट केलं की हे प्रकरण पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या (एएसआय) अखत्यारित येतं.

सरन्यायाधीशांनी काय टिप्पणी केली होती?

सरन्यायाधीश बी. आर. गवई त्यावेळी म्हणाले होते की “तुम्ही इथून जा आणि भगवान विष्णूकडेच प्रार्थना करा आणि त्यालाच काहीतरी करायला सांगा. तुम्ही असं म्हणताय की तुम्ही भगवान विष्णूचे भक्त आहात. मग भगवान विष्णूलाच काहीतरी करायला सांगा. कारण ते (खजुराहो मंदिर) पुरातत्व विभागाच्या अखत्यारित येणारं स्थळ आहे. पुरातत्व विभागाच्या परवानगीशिवाय तिथे काही करता येत नाही. तिथे काहीही करायचं असेल तर एएसआयची परवानगी घ्यावी लागते. त्यामुळे आम्ही या प्रकरणात दखल देऊ शकत नाही, याबाबत आम्हाला खेद वाटतो.”