पीटीआय, नवी दिल्ली /पाटणा
बिहारमधील मतदारयादीतून वगळलेली ६५ हजार नावे वगळण्याच्या कारणांसह जाहीर करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे विरोधी पक्षांनी स्वागत केले. न्यायालयाने दिलेले स्पष्ट, खात्रीलायक आणि धाडसी आदेश हे राज्यघटनेचे पावित्र्य राखले जाण्यासाठी महत्त्वाचे असून ते ‘आशेचा किरण’ ठरले आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली. बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनीही यामुळे भाजपचे पितळ उघडे पडल्याचा टोला लगावला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तालावर संपूर्ण प्रजासत्ताक नाचविण्याच्या डावपेचांविरोधात काँग्रेस सातत्याने लढा देत आहे. सर्वोच्च न्यायालयाने एसआयआरबाबत दिलेले आदेश म्हणजे या लढ्यातील एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे, असे काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे. तर नागरिकांना त्यांच्या मतदानाच्या हक्कापासून वंचित करण्यासाठी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी आखलेला कट सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे उधळला गेल्याचे तेजस्वी यादव म्हणाले. न्यायालयाच्या अंतरीम आदेशामुळे भाजपचे कारस्थान उघडे पडले असून आमची लढाई सुरूच राहील, तसेच एसआयआरमध्ये सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवरही आम्ही नजर ठेवून आहोत, असे यादव म्हणाले.
‘ठाकूर यांना नोटीस का नाही?’
राहुल गांधी यांनी मतदारयादीतील गोंधळावर आवाज उठविल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठविली होती. मात्र भाजप नेते अनुराग ठाकूर यांनीही असेच आरोप केल्यावर मात्र त्यांना नोटीस बजावण्यात आलेली नाही, असा दावा काँग्रेस नेते पवन खेरा यांनी केला. रायबरेली, वायनाड, डायमंड हार्बर आणि कनौज या मतदारसंघांमधील मतदारयादीत घोटाळा असल्याचा आरोप ठाकूर यांनी बुधवारी केला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना खोट्या मतदारयाद्यांसह लढली गेलेली २०२४ची लोकसभा निवडणूकच रद्दबातल ठरवावी, अशी मागणी खेरा यांनी केली. काँग्रेसला बंगळूरू मध्य मतदारसंघातील महादेवपुरा भागाच्या मतदानाचा विदा मिळविण्यास सहा महिने लागले, ठाकूर यांना मात्र सहा लोकसभा मतदारसंघांचा विदा अवघ्या सहा दिवसांत कसा मिळाला, असा टोलाही त्यांनी लगावला.
भाजपचा काँग्रेसवर आरोप
राहुल गांधी यांनी केलेले मतदारयादीतील गोंधळाचे आरोप, हेच ‘एसआयआर’ची आवश्यकता सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत, असा दावा भाजपने गुरुवारी केला. अनेक पिढ्यांपासून नेहरू-गांधी कुटुंबीयच मतदानप्रक्रियेत गडबड करण्यात गुंतल्याचा आरोप केंद्रीय मंत्री भैरोसिंह शेखावत यांनी केला. सोनिया गांधी यांना देशाचे नागरिकत्व मिळण्याच्या तीन वर्षे आधीपासून त्यांचे नाव मतदारयादीत होते, या आरोपावर काँग्रेसने अद्याप उत्तर दिले नसल्याचा दावाही शेखावत यांनी केला.