नवी दिल्ली : स्वत: काही न करता न्यायालयावर बोझा टाकण्याचा प्रयत्न करू नका, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिल्ली सरकारची कानउघाडणी केली. राष्ट्रीय राजधानीत वाहनांसाठी सम-विषम योजना लागू करण्याचा निर्णय शहराच्या सरकारने घ्यायचा असून न्यायालय त्याबाबत काही निर्देश जारी करणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सम- विषम योजनेशी न्यायालयाचे काहीही देणेघेणे नाही आणि ही योजना आजूबाजूच्या राज्यांतून दिल्लीत येणाऱ्या टॅक्सींनाही लागू करावी असे आपण कधीही म्हटलेले नाही, असे न्या. संजय किशन कौल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने दिल्ली- राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील हवेच्या ढासळत्या दर्जाबाबतच्या याचिकेवर सुनावणी करताना सांगितले.

हवेचे प्रदूषण ज्यावेळी संभवत: शिखरावर जाईल तेव्हा, म्हणजे दिवाळीनंतर १३ ते २० नोव्हेंबर या काळात आम्ही सम-विषम योजना लागू करू असे दिल्ली सरकारने पूर्वी जाहीर केले होते, मात्र सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी या प्रकरणाची सुनावणी केल्यानंतरच ती लागू केली जाईल, असे दिल्लीच्या पर्यावरणमंत्र्यांनी नंतर म्हटले होते.

हेही वाचा >>> ‘आयआयएम’चे संचालक मंडळ बरखास्तीचे सरकारला अधिकार; केंद्राची कायद्यात दुरुस्ती

दरम्यान, अधूनमधून पडलेल्या पावसामुळे शुक्रवारी दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेत वेगाने सुधारणा झाली, तसेच गेल्या दहा दिवसांहून अधिक काळ वातावरणात पसरलेले धुके मोकळे झाले.

दुपारी एक वाजता दिल्लीतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ३१४ इतका, म्हणजे ‘अतिशय वाईट’ श्रेणीतील होता. सकाळी ९ वाजता तो ३७६,तर शुक्रवारी सकाळी सात वाजता ४०८ इतका होता. गुरुवारी सकाळी ११ वाजता एक्यूआय ४६० इतका होता. हवेचा वेग प्रदूषके वाहून जाण्यासाठी अनुकूल असल्यामुळे हवेचा दर्जा आणखी सुधारण्याची अपेक्षा आहे. कुठल्याही वेळचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) हा गेल्या २४ तासांतील नोंदींची सरासरी असते.

दिल्लीतील बहुतांश भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरींची नोंद झाल्याचे हवामान खात्याच्या आकडेवारीवरून दिसले. पंजाब, हरियाणा व पश्चिम उत्तर प्रदेशासह वायव्य भारतातील बहुतांश भागांमध्ये गुरुवार रात्रीपासून पाऊस झाला, असे हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कुलदीप श्रीवास्तव यांनी सांगितले. हवामानाच्या अनुकूल स्थितीमुळे दिवाळीपूर्वी हवेच्या गुणवत्तेत किरकोळ सुधारणा होईल अशी अपेक्षा हवामान खात्याने यापूर्वी व्यक्त केली होती.

दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील प्रदूषणाचा स्तर हा गेल्या काही दिवसांपासून चिंतेचा विषय झाला आहे. पावसामुळे दिल्लीकरांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी दिवाळीनंतर प्रदूषण वाढण्याची भीती आहे. 

सम-विषम योजनेची अंमलबजावणी लांबणीवर

पावसामुळे दिल्लीतील हवेच्या दर्जात लक्षणीय सुधारणा झाल्यामुळे, वाहनांसाठी सम-विषम योजनेची अंमलबजावणी दिल्ली सरकारने लांबणीवर टाकली असल्याचे राज्याचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी शुक्रवारी सांगिते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तोडगा काढा – न्यायालय

दिल्लीलगतच्या पंजाब व इतर काही राज्यांतील पिकांचे खुंट जाळणे थांबवले जायला हवे आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील  प्रदूषणाचा स्तर घटवण्यासाठी तोडगा काढायला हवा, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. प्रदूषणाच्या मुद्दय़ावर अनेक समित्यांचे अहवाल आहेत, मात्र प्रत्यक्षात काहीही घडत नाही, असे मत न्या. संजय किशन कौल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने व्यक्त केले.