Supreme Court on Actor Darshan’ Bail by Karnataka High Court : कानडी अभिनेता दर्शन थूगुदीप याला अपहरण, छळ व हत्येसारख्या गंभीर आरोपांखाली अटक करण्यात आली होती. मात्र, या प्रकरणात काही महिन्यांपूर्वी त्याला कर्नाटक उच्च न्यायालयाने जामीन दिला. त्यानंतर कर्नाटक सरकारने दर्शनविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयावर ‘न्यायिक अधिकाराचा गैरवापर’ अशी टिप्पणी केली आहे. ‘हत्येसारख्या प्रकरणांमध्ये जामीन देणं उचित नाही’, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.

रेणुकास्वामी हत्या प्रकरणात अभिनेता दर्शनला कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या जामीनाविरोधातील कर्नाटक सरकारच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली. मात्र, आपला निर्णय राखून ठेवला आहे. सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने दोन्ही पक्षकारांचे युक्तिवाद ऐकले आणि आपला निर्णय राखून ठेवला. मात्र, सुनावणीवेळी न्यायमूर्तींनी उच्च न्यायालयाच्या निर्णयावर संताप व्यक्त केला.

न्यायमूर्ती म्हणाले, “उच्च न्यायालयाचं डोकं ठिकाणावर आहे का? आम्हाला हे सांगायला खूप वाईट वाटतंय, परंतु, उच्च न्यायालय प्रत्येक जामीन अर्जावर एक प्रकारचाच आदेश देतंय का? अशा प्रकरणांमधील न्यायालयाचा दृष्टीकोन आम्हाला खटकतोय. असा निर्णय एखाद्या सत्र न्यायालयाने दिला असता तर आम्ही समजू शकलो असतो. परंतु, उच्च न्यायालयाने अशा प्रकारे जामीन देणं स्वीकारार्ह नाही.

“विवेकबुद्धीचा वापर न करता दिलेला निर्णय”, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

“उच्च न्यायालय अशा प्रकरणांत चुका करतंय असं आम्हाला वाटतंय. तसेच हा विवेकबुद्धीचा वापर न करता दिलेला निर्णय आहे. उच्च न्यायालयाने इतक्या गंभीर प्रकरणात जामीन मंजूर करताना योग्य प्रकारे विचार केला होता का याची आम्हीत तपासणी करत आहोत. उच्च न्यायालयाने हे प्रकरण हाताळताना केलेल्या चुकीची आम्ही पुनरावृत्ती करणार नाही. कारण हे खून व त्यासाठीचा कट रचल्याचं प्रकरण आहे. त्यामुळे आम्ही अधिक गंभीर आहोत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कर्नाटक सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. उच्च न्यायालयाने १३ डिसेंबर २०२४ रोजी अभिनेता दर्शन व या खूप प्रकरणातील इतर आरोपींना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र, कर्नाटक सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. हा ३३ वर्षीय रेणुकास्वामी यांच्या खूनाशी संबंधित खटला आहे.