पीटीआय, नवी दिल्ली : एल्गार परिषद-माओवादी संबंध प्रकरणातील आरोपी वकील सुरेंद्र गडलिंग यांच्या जामीन अर्जाला वारंवार स्थगिती दिल्याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने याचिका लवकर सुनावणी यादीत घेण्याचे आदेश दिले.

वकील आनंद ग्रोव्हर यांनी, गडलिंग गेल्या साडेसहा वर्षांपासून तुरुंगात असून ११ वेळा जामिनावरील सुनावणी टळली असल्याची माहिती सरन्यायाधीश बी. आर. गवई, न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन आणि न्यायमूर्ती एन. व्ही. अंजारिया यांच्या खंडपीठाला दिली. त्याची दखल घेत सरन्यायाधीशांनी प्रकरणावर सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले.

गडलिंग यांच्यावर माओवाद्यांना मदत करण्याचा आणि या प्रकरणातील फरार आरोपींसह विविध सहआरोपींबरोबर कट रचल्याचा आरोप आहे. २५ मार्च रोजी न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि राजेश बिंदल यांच्या खंडपीठाने गडलिंग आणि या प्रकरणात अटक केलेल्या कार्यकर्त्या ज्योती जगताप यांच्या जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली होती. तत्पूर्वी एनआयएने महेश राऊत याच्या जामीन याचिकेला आव्हान दिल्यामुळे सुनावणीही पुढे ढकलण्यात आली होती. राऊत यांचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला होता तथापि, एनआयएने सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने जामिनास स्थगिती दिली होती.