भगवद्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करण्याची मागणी परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी रविवारी दिल्लीतील एका सभेमध्ये केली. त्याचवेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गीतेची प्रत भेट देऊन एकप्रकारे याला राष्ट्रीय ग्रंथाचे स्थान दिले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
गीतेच्या ५१५१ व्या निर्माणदिनानिमित्त दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘ग्लोबल इन्स्पिरेशन अॅंड एनलाईटन्मेंट ऑर्गेनायझेशन ऑफ गीता’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना सुषमा स्वराज यांनी ही मागणी केली. त्याचवेळी डिप्रेशन असलेल्या रुग्णांना मानसोपचार तज्ज्ञांनी गीतेतील काही अध्याय वाचण्याचा सल्ला द्यावा, असेही आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, सुषमा स्वराज यांच्या या मागणीनंतर लगेचच हिंदूत्त्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून तात्काळ घोषित करण्याची मागणी केली. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी धार्मिक ग्रंथ हे राज्यघटनेपेक्षा श्रेष्ठ समजण्यात यावेत, असे म्हटले आहे.