आम आदमी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालिवाल यांना झालेल्या कथित मारहाण प्रकरणाची देशभरात चर्चा सुरू आहे. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहायक बिभव कुमार यांच्याविरोधात गुन्हादेखील दाखल केला आहे. मात्र, आता याप्रकरणात एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

हा व्हिडीओ स्वाती मालिवाल यांना झालेल्या मारहाणीच्या पूर्वीचा असल्याचे सांगितले जात आहे. महत्त्वाचे म्हणजे या व्हायरल व्हिडीओवर स्वाती मालिवाल यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – स्वाती मालिवाल यांच्या तक्रारीनंतर बिभव कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

या व्हिडीओमध्ये स्वाती मालिवाल या मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानी बसल्या असून सुरक्षा कर्मचारी त्यांना बाहेर जाण्यास सांगत आहेत. यावरूनच बिभव कुमार आणि स्वाती मालिवाल यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाल्याचं दिसून येत आहे. “आज मी लोकांना सांगणार आहे. काय करायचे ते करा. मला हात लावला तर तुझी नोकरी खाऊन टाकेन. मी पोलिसांनी फोन केला आहे. त्यांना इथे येऊ द्या, मग बोलू” असं स्वाती मालिवाल यांनी म्हटलं आहे. तर “मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही बाहेर जा पोलिसांनी बाहेर भेटा” असं सुरक्षरक्षक त्यांना सांगत आहेत. या व्हिडीओची पुष्टी होऊ शकली नसली, तरी हा व्हिडीओ १३ मे रोजीचा असल्याचे सांगितलं जात आहे.

व्हायरल व्हिडीओवर मालिवाल यांची प्रतिक्रिया

या व्हायरल व्हिडीओवर स्वाती मालिवाल यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “दरवेळेप्रमाणेच यावेळीही राजकीय हिटमॅनने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्याने आपल्या लोकांना अर्धवट व्हिडीओ पोस्ट करायला सांगितले आहे. अशाप्रकारे अर्धवट व्हिडीओ शेअर करून या प्रकरणातून आपण स्वत:ला वाचवू शकतो, असं त्याला वाटते. मुळात कोणी कोणाला मारहाण करताना व्हिडिओ बनवतो का? त्या खोलीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले तर सर्व सत्य बाहेर येईल. देव सर्व बघतोय”. असं स्वाती मालिवाल यांनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं प्रकरण काय?

१३ मे रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मला मारहाण करण्यात आली, असा आरोप स्वाती मालिवाल यांनी केला होता. त्यांनी अरविंद केजरीवाल यांचे स्वीय साहायक बिभव कुमार यांच्यावर गंभीर आरोप केले होते. याप्रकरणी गुरुवारी दिल्ली पोलिसांच्या पथकाने स्वाती मालिवाल यांच्या घरी जाऊन त्यांचा जबाबही नोंदवला होता. त्यावेळी स्वाती मालीवाल यांनी घडलेल्या घटनेची संपूर्ण माहिती दिली होती. तत्पूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाने बिभव कुमार यांना समन्स बजावले होते. यानुसार बिभव कुमार यांना १७ मे रोजी सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे आदेश दिले होते. तसेच दिल्ली पोलिसांनी बिभव कुमार यांच्या विरोधात गुन्हाही दाखल केला होता.