कमलनाथ आणि भुपेश बघेल म्हणतात की आम्ही हिंदू आहोत. माझं त्यांना खुलं आव्हान आहे की जर तुम्ही हिंदू असाल तर एकदा राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना राम मंदिरात घेऊन या. असं म्हणत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी या दोन्ही नेत्यांना थेट आव्हान दिलं आहे. सूरजपूर येथील रॅलीत हिमंता बिस्वा सर्मा यांनी हा प्रश्न विचारत थेट दोन काँग्रेस नेत्यांना आव्हान दिलं आहे. त्यांचं हे वक्तव्य व्हायरल झालं आहे. ANI ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.
याआधी हिमंता बिस्वा सर्मा यांनी अजयगढ या ठिकाणी जनआशीर्वाद यात्रेच्या अंतर्गत सभा घेतली. या सभेत त्यांनी इंडिया आघाडीवर आणि काँग्रेसवर टीका केली. विरोधकांनी त्यांच्या आघाडीला इंडिया नाव दिलं आहे. मात्र इंडिया नाव दिल्याने कुणी इंडिया होत नाही. जो डुप्लिकेट असतो तो तसाच असतो.
एकीकडे काँग्रेस नेते हिंदू, हिंदू धर्म आणि भगवान श्रीराम यांच्यावर हे घमंडिया आघाडीचे लोक प्रश्न उपस्थित करतात. आणि दुसरीकडे मंदिरांमध्ये जाऊन हनुमान चालीसा आणि रामचरित मानस वाचण्याचं ढोंग करतात. मी या सगळ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही कितीही शिव्या दिल्या तरीही हिंदू धर्म संपणार नाही. यापुढेही तो संपणार नाही असंही सरमा यांनी म्हटलं आहे.