अफगाणिस्तानची आर्थिक परिस्थिती फारच हालाखीची झाली आहे. त्यामुळेच आता जगभरामधून कोट्यावधी डॉलर्सच्या माध्यमातून संघर्षामध्ये होरपळणाऱ्या मध्य आशियामधील या देशाला आर्थिक मदत केली जातेय. देशातील सत्ता काबीज करुन हंगामी सरकार स्थापन करणाऱ्या तालिबानने या आपत्कालीन मदतीसाठी जगभरातील देशांचे आभार मानले आहे. मात्र असं करतानाच तालिबानने अमेरिकेला टोमणाही मारलाय. तालिबानने अमेरिकेला गरीब देशांबद्दल जरा मन मोठं करा असा टोला लगावला आहे. जिनेव्हामध्ये सोमवारी डोनर कॉन्फरन्स पार पडली. यामध्ये अफगाणिस्तानला जवळजवळ १.२ बिलियन डॉलर म्हणजेच आठ हजार कोटी रुपयांची मदत केली जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. अफगाणिस्तानमध्ये ऑगस्टच्या मध्यात तालिबानने सत्ता काबीज केल्यापासून राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती फारच हालाखीची झाली आहे.

नक्की वाचा >> अफगाणिस्तानमध्ये सरकार स्थापन करणाऱ्या तालिबानला इराणचा मोठा दणका, शेजाऱ्यांबद्दल म्हणाले…

अफगाणिस्तानला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत केली जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीय. या देशाला मागील बऱ्याच काळापासून परदेशातून होणाऱ्या आर्थिक मदतीवरच अवलंबून रहावे लागत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये तालिबानला परदेशातून मोठ्या प्रमाणात मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहे. देशातील सत्ता संघर्षादरम्यान महागाई कमालीची वाढली असून दैनंदिन जीवनातील रोजच्या खाण्या पिण्याच्या वस्तूंचे दर प्रचंड वाढलेत. ही विस्कटलेली आर्थिक गणितं मार्गी लावण्यासाठी आता अफगाणिस्तान इतर देशांच्या मदतीवर अवलंबून आहे.

नक्की वाचा >> अफगाणिस्तानमधील लूडबूड पाकिस्तानला महागात पडणार?; भारताचा उल्लेख करत अमेरिकेने दिला इशारा

तालिबानच्या हंगामी सरकारमधील परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्तकी यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये अफगाणिस्तानला मिळणाऱ्या आर्थिक मदतीबद्दल भाष्य केलं. आम्ही हे पैसे विचारपूर्वक खर्च करणार आहोत असं मुत्तकी म्हणाले. “या पैशांचा वापर दारिद्र्य दूर करण्यासाठी केल जाईल. आम्ही जगभरातील देशांनी केलेल्या एक अब्ज डॉलर्सच्या मदतीसाठी त्यांचे आभार मानतो. भविष्यातही ते अशाप्रकारची मदत करतील अशी अपेक्षा आहे. पारदर्शक कारभाराच्या माध्यमातून हा पैसा गरजूंपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न सरकार करेल,” असा विश्वास मुत्तकी यांनी व्यक्त केलाय.

नक्की वाचा >> “चीनला आपला सर्वात मोठा शत्रू समजणं ही…”; ९/११ हल्ल्याच्या २० व्या स्मृतीदिनी अमेरिकेला चीनचा इशारा

मुत्तकी यांनी यावेली अमेरिकेला टोला लगावला आहे. मागील महिन्यामध्ये आम्ही अमेरिकन लष्कराबरोबरच हजारो लोकांना परतण्यासाठी परवानगी दिल्याबद्दल अमेरिकेने तालिबानचं कौतुक केलं पाहिजे. अमेरिका एक मोठा देश असून त्यांचं मन मोठं असलं पाहिजे, असंही मुत्तकी म्हणालेत. अफगाणिस्तानला दुष्काळाचाही सामना करावा लागत असल्याचं मुत्तकी म्हणाले आहेत. पाकिस्तान, कतार आणि उजबेगिस्तानसारख्या देशांनी तालिबानला आधीच मदत दिली आहे. मात्र या देशांनी किती मदत केली याबद्दलची आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही.