अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी केलेल्या आक्रमणाचे पडसाद जगभरात उमटू लागले आहेत. तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर जगभरात चिंतेंच वातावरण आहे. आपापल्या देशाच्या राजदूतांना तसंच नागरिकांना वाचवण्यासाठी अनेक देशांनी प्रयत्न करत त्यांना तेथून बाहेर काढले जात आहे. दरम्यान, तालिबान्यांचा आणि भारताचे शेजारी राष्ट्र पाकिस्तानचा जवळचा संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच अफगाणिस्तानच्या जवळ भारत, चीन आणि रशिया हे देशही असल्याने त्यांच्यासोबत तालिबानचे संबंध कसे असतील याकडे सर्वांचेच लक्ष आहे. त्यानंतर आता तालिबानचे नेते शेर मोहम्मद अब्बास स्टानेकझाई यांनी भारताबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.

तालिबानचे नेते शेर मोहम्मद अब्बास स्टानेकझाई यांनी त्यांच्या संघटनेला भारतासोबत अफगाणिस्तानचे राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध पूर्वीप्रमाणेच टिकवायचे आहेत असे म्हटले आहे. तालिबानच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या सदस्याने या विषयावर उघडपणे मत व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. शनिवारी तालिबानच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आलेल्या ४६ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये अफगाणिस्तानमधील युद्ध संपवण्याची तालिबानची योजना आणि अफगाणिस्तानमधील शरिया आधारित इस्लामिक शासन याविषयी स्टानेकझाई यांनी तपशीलवार माहिती दिली.

हे ही वाचा >> अमरुल्ला सालेह यांना रोखण्यासाठी तालिबानचा मोठा निर्णय

पश्तोमध्ये बोलताना, स्टानेकझाई यांनी तालिबानच्या जवळच्या क्षेत्रातील प्रमुख देश, भारत, पाकिस्तान, चीन आणि रशिया यांच्याशी संबंधांबद्दलचा दृष्टिकोन सांगितला. तालिबानने १५ ऑगस्ट रोजी काबूल ताब्यात घेतल्यानंतर आणि अश्रफ घनी सरकारच्या पडल्यानंतर तालिबानचे प्रवक्ते झबीउल्लाह मुजाहिद यांनी पाकिस्तानी माध्यम वाहिन्यांवर भारताशी असलेल्या संबंधांबद्दल संघटनेचे मत मांडले आहे. तर, इतर देशांशी असलेल्या संबंधांबाबत निवेदन देणारे स्टानेकझाई हे पहिले ज्येष्ठ नेते आहेत. भारत या खंडासाठी खूप महत्त्वाचा आहे. आम्हाला भारतासोबत पूर्वीप्रमाणे सांस्कृतिक, आर्थिक आणि व्यापारी संबंध राखायचे आहेत असे स्टानेकझाई म्हणाले.

समजून घ्या : तालिबानी नक्की आहेत तरी कोण? आणि त्यांच्यापासून जगाला एवढा धोका का वाटतोय?

अफगाण सैन्याच्या कॅडेट्ससाठी प्रशिक्षणाचा भाग म्हणून १९८० च्या दशकात स्टानेकझाई देहरादूनच्या इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये आले होते. १९९६ मध्ये, तालिबानने काबूलवर पहिल्यांदा ताबा घेतल्यानंतर त्यांनी भारताकडे असाच एक प्रस्ताव दिला होता, जेव्हा ते काळजीवाहू उप परराष्ट्र मंत्री होते. यावेळी, त्यांचे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा भारताने काबुलमधील दूतावासातून आपले सर्व भारतीय राजनैतिक कर्मचारी परत बोलावले आहेत.

“या उपखंडासाठी भारत खूप महत्त्वाचा आहे. आम्हाला पूर्वीप्रमाणे भारतासोबत आपले सांस्कृतिक, आर्थिक आणि व्यापारी संबंध चालू ठेवायचे आहेत. आम्ही भारतासोबतच्या आमच्या राजकीय, आर्थिक आणि व्यापारी संबंधांना योग्य महत्त्व देतो आणि हे संबंध कायम राहावेत अशी आमची इच्छा आहे. आम्ही या संदर्भात भारतासोबत काम करण्यास उत्सुक आहोत, ” असे स्टानेकझाई यांनी म्हटले आहे.

समजून घ्या : अफगाणिस्तानच्या पंजशीर व्हॅलीमध्ये जाण्यासाठी का घाबरतंय तालिबान?

स्टानेकझाई यांनी सांगितले की, भारतासोबत पाकिस्तानच्या माध्यमातून व्यापार करणे आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. भारताबरोबर हवाई मार्गाने व्यापार देखील सुरू राहील. मात्र, त्यांनी भारताशी व्यापार दुतर्फा होईल की नाही हे सांगितले नाही. पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या व्यापाऱ्यांना त्यांच्या देशातून माल पाठवण्याची परवानगी दिली आहे, पण भारतातील वस्तू या मार्गाने अफगाणिस्तानात जाऊ देत नाही.