मंगळवारी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. पूर्ण दिवस महिला दिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता. अनेक ठिकाणी महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. अगदी सर्वसामान्यांपासून ते कलाकार आणि राजकारण्यांनी देखील महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान, महिला दिनानिमित्त अफगाणिस्तानमध्ये सत्तेवर असलेल्या तालिबानने देखील महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तालिबानने तिथल्या महिलांसाठी एक संदेशही दिलाय.

“आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, मी सांगू इच्छितो की, इस्लामिक नियमांनुसार महिलांना त्यांचे सर्व मूलभूत अधिकार आहेत. ते याचा लाभ घेऊ शकतात. त्यांच्या न्याय्य गरजा आणि मागण्या पूर्ण करण्यासाठी सुरक्षित वातावरण देण्यासाठी IEA वचनबद्ध आहे,” असे ट्वीट यूएनमध्ये अफगाणिस्तानचे स्थायी प्रतिनिधी म्हणून नियुक्त केलेले आणि तालिबानचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी केले.

तालिबाननं दिलेल्या शुभेच्छांची चर्चा होण्याचं कारण म्हणजे दोन महिन्यांपूर्वी काम आणि शिक्षणाच्या हक्कांची मागणी करत काबूलमध्ये आंदोलन करणाऱ्या महिलांच्या गटाला पांगवण्यासाठी तालिबान सैन्याने मिरपूड स्प्रेचा वापर केला होता. त्याशिवायही अनेकदा अफगाणिस्तानमध्ये महिलांवर तालिबानने बंधने लादली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अध्यक्ष अश्रफ घनी यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही पद्धतीने निवडून आलेले सरकार उलथून टाकून गेल्या ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानवर विजय मिळवून, तालिबानने सत्ता स्थापन केली होती. सत्तेत आल्यानंतर त्यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये मुलं आणि मुली यांनी एकत्र शिक्षण घेऊ नये, एकत्र शिक्षण दिलं जात असेल तर पडद्यांनी ते एकमेकांना दिसणार नाहीत, अशी व्यवस्था करण्याचे आदेश दिले होते.