वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

इस्रायल आणि इराणदरम्यान सुरू असलेल्या लष्करी संघर्षात अमेरिकेच्या दृष्टीने पाकिस्तानचे महत्त्व वाढताना दिसत आहे. या संघर्षात उतरण्यासाठी अमेरिकेला पाकिस्तानची हवाई हद्द वापण्याची मुभा हवी असल्याचे सांगण्यात येत आहे. इराण-इस्रायल संघर्षात अमेरिकी लष्कर सहभागी होईल की नाही याचा निर्णय दोन आठवड्यांमध्ये घेतला जाईल असे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. तसे झाले तर या संघर्षाला व्यापक युद्धाचे स्वरूप प्राप्त होण्याची भीती आहे.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल असिम मुनीर यांनी अलिकडेच अमेरिकेचा दौरा केला. त्या भेटीदरम्यान त्यांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर व्हाइट हाऊसमध्ये दीर्घकाळ चर्चा केली. त्यामध्ये मुख्यत: इराण-इस्रायल संघर्षावर विस्ताराने बोलणी झाली. आपल्या अमेरिका भेटीत मुनीर यांनी अमेरिकेच्या धोरणांवर प्रभाव टाकणाऱ्या अन्य घटकांशी विस्ताराने चर्चा केली अशी माहिती पाकिस्तानी लष्कराच्या माध्यम विभागाने (आयसीपीआर) शुक्रवारी दिली.

इराण-इस्रायल संघर्षात पाकिस्तानच्या संभाव्य भूमिकेबद्दल विचारले असता, तो देश इराणला अतिशय चांगल्या पद्धतीने ओळखतो आणि त्यांनाही जे काही घडत आहे ते पटत नाही असे उत्तर ट्रम्प यांनी दिले. पाकिस्तानचे भू-राजकीय स्थान पाहता इराणमध्ये युद्ध भडकले तर अमेरिकेच्या दृष्टीने असिम मुनीर हे सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतील असे मानले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे अशा परिस्थितीत इराणला लागून असलेल्या आणि आधीच अस्थिर व अशांत असलेल्या बलुचिस्तानमधील परिस्थिती अधिक चिघळेल अशी भीती पाकिस्तानला वाटत असल्याचे वृत्त ‘रॉयटर्स’ने दिले आहे.