गेल्या दोन महिन्यांपासून अपोलो रुग्णालयात दाखल असलेल्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना रविवारी संध्याकाळी ह्रदयविकाराचा झटका  आला. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु असल्याचे अपोलो रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.

६८ वर्षीय जयललिता यांना २२ सप्टेंबर रोजी ताप आल्यामुळे चेन्नईतील अपोलो रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र त्यानंतर जयललिता यांना मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसात संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर चेन्नईतील अपोलो रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून लवकरच त्यांना डिस्चार्ज दिले जाईल अशी माहिती रुग्णालयाने दिली होती. मात्र रविवारी संध्याकाळी त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. जयललिता यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचे समजताच अपोलो रुग्णालयाबाहेर त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली. अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते. जयललिता यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी पूजाअर्चनाही सुरु झाल्या आहेत.

जयललिता यांच्या प्रकृतीविषयीचे वृत्त समजताच महाराष्ट्रासह तामिळनाडूच्या राज्यपालपदाची धूरा सांभाळणारे सी विद्यासागरराव तामिळनाडूला रवाना झाले. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील विद्यासागर राव यांच्याशी दुरध्वनीवर चर्चा केली. तामिळनाडू पोलिसांनी अपोलो रुग्णालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. केंद्रीय सुरक्षा दलाच्या पथकांनाही सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अपोलो रुग्णालयानेही जयललिता यांच्या प्रकृतीविषयी ट्विटरवरुन माहिती दिली आहे. जयललिता यांच्यावरील उपचारासाठी लंडनमधील ह्रदयरोग तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेतली जात असल्याचे अपोलो रुग्णालयाने स्पष्ट केले. तामिळनाडूच्या जनतेने संयम ठेवावे आणि जयललिता यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करावी असे आवाहन रुग्णालयाने केले आहे. तसेच दिल्लीतील एम्स रुग्णालयातील डॉक्टरांची टीमही अपोलो रुग्णालयात येईल असे वृत्त वृत्तवाहिन्यांनी दिले आहे.