Tej Pratap Yadav Reaction: राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) पक्षाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी काही दिवसांपूर्वी त्यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव याची पक्ष आणि कुटुंबातून हकालपट्टी केली होती. बेजबाबदार वर्तन आणि सामाजिक संकेतांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करत असल्याचे लालू प्रसाद यादव यांनी स्पष्ट केले होते. यानंतर बरेच दिवस तेज प्रताप यादव यांनी यावर प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र आज पहाटे त्यांनी एक्सवर एक भावनिक पोस्ट टाकत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये तेज प्रताप यांनी लालू प्रसाद यादव आणि आई राबडी देवी यांना आपले संपूर्ण जग म्हटले आहे. तसेच पक्षातील काही नेत्यांवरही त्यांनी आरोप करत विश्वासघात आणि कुटुंबाची एकता बिघडवल्याचा आरोप केला आहे.
तेज प्रताप यांनी लिहिले, “माझे प्रिय आई, बाबा… तुम्ही दोघे माझे संपूर्ण जग आहात. तुम्ही आणि तुमचा कोणताही आदेश मला देवापेक्षाही मोठा आहे. तुम्ही आहात तर माझ्यासाठी सर्व काही आहे. मला फक्त तुमचा विश्वास आणि प्रेम पाहिजे, बाकी काही नको. बाबा तुम्ही नसता तर ना हा पक्ष असता, ना माझ्याबरोबर राजकारण करणारे काही लालची लोक. आई आणि बाबा तुम्ही दोघेही निरोगी आणि आनंदी रहा.”
२५ मे रोजी तेज प्रताप यांच्या फेसबुकवर अनुष्का यादव या महिलेशी प्रेमसंबंध असल्याची पोष्ट शेअर करण्यात आली होती. त्यानंतर काही वेळातच सदर पोस्ट डिलीट करत अकाऊंट हॅक झाल्याचा दावा तेज प्रताप यादव यांनी केला. मात्र तोपर्यंत हे प्रकरण चांगलेच गाजले. त्याच दिवशी सायंकाळी लालू प्रसाद यादव यांनी मुलाला पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केल्याचे जाहीर केले.
तेज प्रताप यादव यांनी केली सारवासारव
अनुष्का यादव यांच्याबरोबरचा फोटो आणि पोस्ट व्हायरल झाल्यानंतर तेज प्रताप यादव यांनी नंतर सारवासारव केली. तेज प्रताप यादव यांनी ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये लिहिले, “माझा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म हॅक करण्यात आला आहे.” “माझे फोटो चुकीचे एडिट करून, मला आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांना त्रास दिला जात आहे आणि त्यांची बदनामी केली जात आहे. मी माझ्या हितचिंतकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि अफवांकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन करतो,” असे त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले.