पीटीआय, पाटणा

विरोधकांच्या इंडिया आघाडीने राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते तेजस्वी यादव यांची बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली. यातून आघाडीतील मतभेदांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न मानला जातो.

महाआघाडीतील वाद सोडविण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत हे दोन दिवस पाटण्यात होते. पत्रकार परिषदेत त्यांनी तेजस्वी यांच्या नावाची घोषणा केली. काँग्रेस पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या संमतीनंतर हा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. याखेरीज ४५ वर्षीय मुकेश साहनी हे सत्ता आल्यास उपमुख्यमंत्री असतील. हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंधित असलेल्या सहानी यांनी २०१५ मध्ये विकासशील इन्सान पक्षाची स्थापना केली. कधी राजद-काँग्रेस तर कधी भाजपबरोबर त्यांची युती होती. गेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला चार जागा मिळाल्या होत्या.

तेजस्वी यांनी मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित केल्याबद्दल मित्र पक्षांचे आभार मानले. भ्रष्टाचार तसेच गुन्हेगारीबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असे ३५ वर्षीय तेजस्वी यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले. ‘जंगलराज’च्या मुद्द्यावर भाजप अपप्रचार करत असल्याचा आरोप तेजस्वी यांनी केला. हे पक्ष सत्तेत असताना राज्यात गुन्हेगारी वाढल्याचे त्यांनी नमूद केले. इंडिया आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित केला आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीने त्यांचे नाव जाहीर करावे, असे आव्हान काँग्रेसचे माध्यम विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी दिले. तेजस्वी यांचे नाव घोषित केले असले तरी, काँग्रेसने आमची आघाडी ही एका व्यक्तीवर आधारित नाही तर ही परस्परांच्या आदरावर आधारित जनयुती आहे असे नमूद केले.

जनता दल, भाजपची टीका

तेजस्वी यांचे नाव जाहीर होताच भाजप तसेच संयुक्त जनता दलाने टीका केली. तेजस्वी यांच्या नेतृत्वात विरोधकांनी २०१९ व २०१४ ची लोकसभा निवडणूक लढवली होती.

त्यात पराभव झाल्याची आठवण जनता दलाचे प्रवक्ते नीरजकुमार यांनी करून दिली.

विरोधकांच्या पत्रकार परिषदेत फलकांवर केवळ तेजस्वी यादव यांचेच छायाचित्र होते, असा टोला भाजपने समाजमाध्यमातून लगावला.