दुबई : अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर तणावात भर पडली असून, भारतासह जागतिक नेत्यांनी तणाव निवळण्याचे आवाहन इराणला केले आहे. पाकिस्तानसह इतर मुस्लिम देशांनी हल्ल्याचा निषेध केला असून, पाश्चिमात्य देशांसह लेबनॉनने इराणने चर्चेसाठी पुढे यावे, असे म्हटले आहे.
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनीही इराणला चर्चेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले. या ठिकाणी स्थैर्य आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या हल्ल्यात आमचा सहभाग नव्हता, अशी प्रतिक्रिया फ्रान्सचे परराष्ट्रमंत्री जान नोएल बॅरो यांनी दिली. जर्मनी, न्यूझीलंड, जपान, ऑस्ट्रेलियानेही चर्चेचे आवाहन केले आहे.
अमेरिकेच्या थेट सहभागामुळे जागतिक तणाव वाढेल आणि अनेक देश अण्वस्त्रे आणि स्वनातीत क्षेपणास्त्रे तयार करतील, अशी भीती रशियाच्या अधिकाऱ्याने व्यक्त केली. तर या हल्ल्यांमुळे परिस्थिती विकोपाला गेल्याची प्रतिक्रिया चीनने दिली आहे.
पाकिस्तानने या हल्ल्यांचा निषेध केला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याचा हा भंग असून, या भागात तणाव आणखी वाढण्याची शक्यता पाकिस्तानने व्यक्त केली आहे. सौदी अरेबिया, कतार, इराक आणि ओमान या देशांनी अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध केला आहे.
जिहाद करण्याचे हुथी बंडखोरांचे आवाहन
येमेनमधील हुथी बंडखोर आणि हमासने अमेरिकेच्या हल्ल्याचा निषेध केला. हुथी बंडखोरांनी इराणला इस्रायली आणि अमेरिकी आक्रमणाविरोधात पाठिंबा देण्याची ग्वाही दिली. इस्रायली आणि अमेरिकी आक्रमणाविरोधात मुस्लिम देशांनी जिहाद करावा, अशी प्रतिक्रिया हुथी राजकीय ब्युरोने निवेदनातून दिली आहे.
आधीच अस्थिर असलेल्या प्रदेशातील अशांततेमध्ये ही धोकादायक वाढ आहे आणि जागतिक शांतता व सुरक्षेला थेट धोका आहे. हा संघर्ष झपाट्याने नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती आहे. त्याचे भीषण परिणाम नागरिक, प्रदेश आणि जगाला भोगावे लागू शकतात.
–अंटोनियो गुटेरेस, सरचिटणीस, संयुक्त राष्ट्रे