PM Narendra Modi On Operation Sindoor : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये तब्बल ९ ठिकाणी असलेल्या दहशतवादी तळांना उद्ध्वस्त केलं. दरम्यान, भारताने पाकिस्तानला दिलेल्या चोख प्रत्युत्तरानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला चांगलंच सुनावलं.
भारत यापुढे दहशतवादाला थारा देणार नाही, पाकिस्तानबरोबर आता फक्त दहशतवादविरोधात आणि पाकव्याप्त काश्मीरबाबतच चर्चा होणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी स्पष्ट केलं. तसेच यावेळी पंतप्रधान मोदी यांनी एक महत्वाचं विधानही केलं. ‘पाकिस्तानने दहशतवादाला संपवलं नाही तर एक दिवस तेच पाकिस्तानचं अस्तित्व संपवतील’, असा इशारा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय म्हणाले?
“ऑपरेशन सिंदूर हे फक्त नाव नाही, तर देशातील कोट्यवधी लोकांच्या भावनांचं प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे. पाकिस्ताननं आपल्या लष्करी तळांना लक्ष्य केलं. मात्र, यातही पाकिस्तान स्वत: उघडा पडला. जगानं पाहिलं की कशा प्रकारे पाकिस्तानचे ड्रोन, क्षेपणास्त्रं भारतासमोर निष्प्रभ झाले. त्यामुळे पाकिस्तानची तयारी सीमेवर वार करण्याची होती. मात्र, भारताने पाकिस्तानच्या छातीवर वार केला”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
“सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकनंतर आता ऑपरेशन सिंदूर हेच दहशतवादविरोधात भारताचं धोरण आहे. ऑपरेशन सिंदूरने दहशतवादविरोधातील लढ्याबाबत एक नवी रेषा, नवी पद्धत निश्चित केली. त्यामुळे आता भारतावर दहशतवादी हल्ला झाला तर सडेतोड उत्तर दिलं जाईल. भारत एवढा मोठा निर्णय घेऊ शकतो, हे दहशतवाद्यांना स्वप्नातही वाटलं नसेल”, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.
“भारत आता दहशतवाद सहन करणार नाही. पाकिस्तानचं सरकार दहशतवाद्यांना ज्या प्रकारे पोसतं आहे, त्यावरुन हे दिसतं की हे दहशतवादच एक दिवस पाकिस्तानला संपवेल. पाकिस्तानला त्यांचा दहशतवादी ढाचा उद्ध्वस्त करावा लागेल. टेरर आणि टॉक एकत्र चालणार नाही. तसेच पाणी आणि रक्ताचे पाटही एकत्र वाहणार नाही. आज मी आज स्पष्ट सांगतो की जर पाकिस्तानशी चर्चा करायची असेल तर ती पाकव्याप्त काश्मीर आणि दहशतवाद विरोधासंदर्भातच असेल”, असा स्पष्ट इशारा पंतप्रधान मोदींनी दिला.