scorecardresearch

पाच वेळा झाला होता महात्मा गांधींच्या हत्येचा प्रयत्न

यापैकी तीन हल्ल्यांमध्ये नथुराम गोडसेचा सहभाग होता

महात्मा गांधींच्या हत्येचा प्रयत्न
महात्मा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांची आज ७२ वी पुण्यतिथी. आजच्याच दिवशी नथुराम गोडसेने गांधीजींची गोळ्या घालून हत्या केली होती. या घटनेला आज ७२ वर्षे पूर्ण झाली. मात्र त्याआधीही चार वेळा गांधीजींच्या हत्येचा प्रयत्न झाला आहे हे अनेकांना ठाऊक नाही. याचबद्दल या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

पहिला प्रयत्न

जी. डी. तेंडुलकर यांचे गांधीचरित्र. अत्यंत अधिकृत मानले जाते ते. त्याच्या तिसऱ्या खंडातल्या २० व्या प्रकरणात गांधींवरील एका बॉम्बहल्ल्याची माहिती दिली आहे. गांधींनी १९३४ मध्ये अस्पृश्यतानिवारणासाठी देशव्यापी दौरा सुरू केला होता. १९ जूनला ते त्यासाठी पुण्यात आले. २५ जूनला नगरपालिका सभागृहात ते भाषणासाठी गेले. त्या वेळी त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर बॉम्बहल्ला करण्यात आला होता. बॉम्ब फेकणाऱ्याचा समज असा होता की, गांधीजी पुढच्या गाडीत आहेत. ते होते मागच्या गाडीत. त्यामुळे ते बचावले. पण पालिकेचे मुख्याधिकारी, दोन पोलीस यांसह सात जण त्यात जखमी झाले.

दुसरा प्रयत्न

यानंतर दहा वर्षांनी, जुलै १९४४ मध्ये असाच एक छोटेखानी प्रयत्न झाला होता. आजारी गांधी पाचगणीमध्ये विश्रांतीसाठी आले होते. तेव्हा त्यांना भेटण्यासाठी पुण्याहून १५-२० जणांचा एक गट आला. त्यांनी दिवसभर गांधींच्या नावाने शिमगा केला. गांधींनी त्यांना भेटायला बोलावले. त्यांनी नकार दिला. संध्याकाळी प्रार्थनेच्या वेळी मात्र त्यातला एक तरुण घुसला आणि हातात सुरा घेऊन गांधींच्या दिशेने धावून गेला. मणिशंकर पुरोहित आणि साताऱ्याचे भि. दा. भिलारे गुरुजी यांनी त्याला पकडले. त्यावेळी त्या तरुणाने स्वत:चे नाव नथुराम गोडसे असल्याचे सांगितले होते असं म्हटलं जातं. त्यांनी ‘अग्रणी’चे वार्ताहर जोगळेकर यांना आधीच सांगितले होते, की साताऱ्याहून आज महत्त्वाची बातमी येणार आहे. ती आली पण ती होती सभेत झालेल्या या गोंधळाची. ‘पूना हेरल्ड’चे संपादक ए. डेव्हिड यांनी न्या. कपूर आयोगासमोर तशी साक्ष दिली आहे.

तिसरा प्रयत्न

या घटनेनंतर दोन महिन्यांनी म्हणजेच सप्टेंबर १९४४ मध्ये पुन्हा सेवाग्राममध्ये नथुराम गोडसे आणि त्यांच्या ल. ग. थत्ते या साथीदारास जंबियासह पकडण्यात आले. तेव्हा गांधी तेथेच होते.

चौथा प्रयत्न

गांधींना मारण्याचा आणखी एक प्रयत्न १९४६ मध्येही झाला होता. २९ जून १९४६ रोजी गांधीजी मुंबईहून पुण्याला रेल्वेने निघाले होते. त्या ट्रेनचा उल्लेख गांधी स्पेशल असा करण्यात आला आहे. त्या ट्रेनला अपघात व्हावा या उद्देशाने कोणी तरी नेरळ-कर्जतच्या दरम्यान रेल्वेमार्गावर मोठमोठय़ा दरडी टाकल्या होत्या. गाडी पूर्ण वेगात होती. पण चालकाने प्रसंगावधान दाखवून अपघात टाळला. गांधी बचावले. ही माहिती ‘हरिजन’च्या ७ जुलै १९४६ च्या अंकातही आहे.

पाचवा प्रयत्न

गांधीवर पाचवा हल्ला ३० जानेवारी १९४८ रोजी करण्यात आला. यावेळी नथूराम गोडसेने दिल्लीमधील एका प्रार्थना सभेनंतर गांधीजींवर गोळ्या झाडल्या आणि त्यातच गांधींचा मृत्यू झाला.

(टीप: यासंदर्भाती मूळ लेख रवि आमले यांनी ‘गांधी नावाचा गुन्हेगार’ या मथळ्याखाली काही वर्षांपूर्वी ‘लोकप्रभा’मध्ये लिहिला होता. तो वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The 5 attempts on mahatma gandhis life scsg

ताज्या बातम्या