नवी दिल्ली : ‘भारत जोडो’ यात्रेला आठवडाभराची सुट्टी असली तरी, भाजपच्या राहुल गांधींवरील टीकेमुळे दोन्ही राष्ट्रीय पक्षांमध्ये वाद मात्र तीव्र झाला आहे. ‘सातत्याने खोटे बोलणारी माफीवीरांची सेना आता माफी मागेल का? माफी मागण्याची भाजपची खोड जुनीच आहे. त्यामुळे त्यांना माफी मागण्यात कोणती अडचण येणार नाही. त्यांचा खोटेपणा पुन्हा उघड झाला असून आता भाजपने माफी मागितली पाहिजे’, असा प्रतिहल्ला काँग्रेसने केला आहे.

काँग्रेसच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी ‘माफीवीर’ शब्दांचा जाणूनबुजून वापर करताना वीर सावरकरांचे नाव घेणे मात्र टाळले. ‘भारत जोडो’ यात्रेच्या महाराष्ट्रातील टप्प्यात राहुल गांधी यांनी सावरकरांवर टीका करून वाद निर्माण केला होता. नाताळची सुट्टी साजरा करण्यासाठी राहुल गांधी परदेशात जाणार असल्याने यात्रेला सुट्टी देण्यात आली असल्याची उपहासात्मक टीका भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली होती.  त्याला काँग्रेसने सोमवारी  संतप्त प्रत्युत्तर दिले.

‘केंद्रीय मंत्र्यांचा दावा खोटा ठरला असून त्यांनी माफी मागितली पाहिजे’, अशी मागणी पक्षाचे माध्यमविभाग प्रमुख जयराम रमेश यांनी केली. ‘दिल्लीतील कडाक्याच्या थंडीत भाजपचे मंत्री आणि नेते घोंगडी ओढून भारत तोडण्याचे काम करत असताना राहुल गांधींनी महापुरुषांच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली’, असे पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत पत्रकार परिषदेत म्हणाल्या.

 ‘भारत जोडो’ यात्रा शनिवारी दिल्लीत दाखल झाली. लालकिल्यावरील जाहीर भाषणानंतर राहुल गांधी हे महात्मा गांधी, पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी, चौधरी चरण सिंह आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी जाणार होते. सोमवारी सकाळी ७ अंश सेल्सिअस तापमानात राहुल गांधी महापुरुष, माजी पंतप्रधानांच्या समाधीच्या दर्शनासाठी यमुनातिरी गेले होते. त्याचा संदर्भ देत श्रीनेत यांनी, भाजपच्या नेत्यांचा खोटेपणा उघड झाल्याचा आरोप केला.

काँग्रेसने माफी मागण्याची भाजपची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीटीआय, नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यालयातील समन्वयक गौरव पंडित यांनी दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयी ट्विटरवर केलेल्या आक्षेपार्ह विधानावर काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणी सोमवारी भाजपने केली. काँग्रेसने मात्र पंडित यांच्या वक्तव्याशी काँग्रेसचा कोणताही संबंध नाही, अशी भूमिका घेतली. भाजपने म्हटले आहे की, काँग्रेसचे काही लोक एकीकडे वाजपेयी यांची बदनामी करीत असताना राहुल गांधी यांनी ‘सदैव अटल’ या समाधीस्थळी जाणे हे केवळ नाटक आहे.