काँग्रेसने दहा वर्षात अर्थव्यवस्थेची प्रगती किती केली? १२ क्रमांकावरुन ११ व्या क्रमांकावर. आम्ही पाचव्या क्रमांकावर अर्थव्यवस्था आणली आहे. हे काँग्रेसवाले आम्हाला अर्थव्यवस्थेवर शिकवत आहेत. काँग्रेसने ओबीसींना आरक्षणही नीट दिलं नाही. बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न देण्यास योग्य नाहीत असं ज्यांना वाटत होतं आणि ज्यांनी आपल्याच कुटुंबातल्या लोकांना भारतरत्न पुरस्कार दिले असे लोक आम्हाला उपदेश देत आहे. सामाजिक न्याय या विषयावर आम्हाला ते शिकवत आहेत. ज्या काँग्रेसच्या नेत्याची गॅरंटी नाही, नीतीची काही गॅरंटी नाही ते मोदी गॅरंटीवर प्रश्न कसे काय उपस्थित करत आहेत? असाही प्रश्न मोदी यांनी विचारला आहे.
काँग्रेसवर कडाडून टीका
एक तक्रार अशी होती की देश आणि जग यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळाकडे असं का पाहतो? देशाला यांचा इतका राग का आला? ही यांच्याच कर्माची फळं आहेत. जे काही करणार त्याची फळं इथेच भोगायची आहेत. आम्ही लोकांना सांगितलं नाही तुम्ही यांच्याविषयी असं बोला. लोकच यांच्याविषयी बोलत आहेत. मी एक म्हणणं वाचून दाखवतो. ‘सदस्यांना माहीत आहे की आपली ग्रोथ कमी झाली आहे. महागाईचा दर वाढतो आहे. करंट अकाऊंट डेफिसिट आमच्या अपेक्षेपेक्षा जास्तच गेलाय.’ हे म्हणणं माझं नाही मनमोहन सिंग यांचं हे म्हणणं आहे. देशाची अवस्था काय हे त्यांनी सांगितलं होतं. मी आता दुसरं म्हणणं वाचून दाखवतो. ‘देशात खूप राग आहे, सरकारी संस्थांचा गैरवापर होतो आहे.’ असंही मनमोहन सिंग यांनी म्हटलं होतं. आता मी तिसरं म्हणणं मांडतो, ‘टॅक्स कलेक्शनमध्ये भ्रष्टाचार होतो, त्यामुळे जीएसटी आणला पाहिजे. गरीबातला गरीब हा आणखी गरीब होतोय त्याला त्यातून बाहेर काढलं पाहिजे. सरकारी कंत्राटं जशी दिली जात आहेत त्यावर प्रश्न उपस्थित होत आहेत ही पद्धतही बदलली पाहिजे.’ हे देखील माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले होते. त्यांच्या आधी एक पंतप्रधान म्हणाले होते की दिल्लीतून मी १ रुपया पाठवतो पण पोहचतात १५ पैसे. आजार काय हे माहीत होतं. पण त्यावर सुधारणा काहीच केल्या गेल्या नाहीत. असाही टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
धोरण लकवा ही काँग्रेसची ओळख झाली होती
धोरण लकवा ही तर काँग्रेसची ओळख झाली होती. मात्र आमचं सरकार तसं नाही. आमच्या निर्णयाक निर्णयांबाबत देश आमची आठवण काढतो आहे. आम्ही खूप मेहनत घेऊन देशाला संकटांमधून बाहेर घेऊन आलो आहोत. देश आम्हाला उगाच आशीर्वाद देत नाही हे लक्षात घ्या. आपल्या सदनात ब्रिटिशांची आठवण काढण्यात आली. राजे-महाराजे इंग्रजांच्या बाजूने असणारेही होते. इंग्रजांपासून प्रेरणा कुणी घेतली? काँग्रेसचा जन्म कसा झाला हे मी विचारणार नाही.
हे पण वाचा- “काँग्रेसची विचारधारा ‘आऊटडेटेड’, इतक्या मोठ्या पक्षाचं अधःपतन..”; राज्यसभेत मोदींची टोलेबाजी
गुलामगिरीची मानसिकता स्वातंत्र्यानंतर कुणी राबवली?
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळूनही देशात गुलामगिरीची मानसिकता कुणी वाढवली? जर तुम्ही इंग्रजांपासून प्रभावित नव्हता तर दंड संहिता जी इंग्रजांनी तयार केली होती ती बदलली का नाही? इंग्रजांच्या काळातले शेकडो कायदे का बदलले नाही? लाल बत्ती संस्कृती किती दशकं देशात सुरु होता? भारताचं बजेट संध्याकाळी पाच वाजता मांडलं जात होतं कारण ब्रिटन संसदेत त्यावेळी सकाळचे नऊ वाजलेले असत. त्या वेळेला अनुसरुन ही परंपरा सुरु होती. इंग्रजांपासून प्रेरणा घेतली नव्हती तर मग सैन्यांच्या चिन्हांवर गुलामीची प्रतीकं का होती? तुमच्यावर इंग्रजांचा प्रभाव नव्हता तर राजपथाचं नाव कर्तव्यपथ करण्यासाठी मोदींची वाट देशाला का बघावी लागली? अंदमान आणि निकोबार या द्विपसमूहांवर इंग्रजी सत्तेचं निशाण का होतं? या देशातल्या सेनेचे जवान देशासाठी शहीद होतं मात्र तुम्ही वॉर मेमोरियल का केलं नाहीत? इंग्रजांचा प्रभाव नव्हता तर मग भारतीय भाषांकडे हीन भावनेने का पाहिलं? तुम्ही जर इंग्रजांच्या प्रभावाखाली नव्हतात तर भारताचा उल्लेख कुठेही मदर ऑफ डेमोक्रसी का केला नाहीत? देश हे काहीही विसरलेला नाही. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.