उत्तर प्रदेशात आगामी काळात कुंभमेळा होणार आहे. याची जोरदार तयारी सुरु असून या कुंभमेळ्यापूर्वीच अलाहाबाद शहराचे नामकरण प्रयागराज करण्यासाठी सरकारकडून वेगाने पावले उचलली जात आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी कुंभमेळ्याच्या तयारीची माहिती पत्रकार परिषदेत दिली, यावेळी त्यांनी अलाहाबादच्या नामकरणाची घोषणा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि कॅबिनेट मंत्र्यांच्या उपस्थितीत अलाहाबादचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला राज्यपाल राम नाईक यांनी देखील यापूर्वीच सहमती दर्शवली होती. त्यानंतर शनिवारी कुंभमेळा मार्गदर्शक मंडळाच्या बैठकीत अलाहाबादचे नाव प्रयागराज करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मात्र, योगींच्या आजच्या घोषणेनंतर अलाहाबादचे नाव बदलण्यावरुन त्यांना विरोधही हाऊ लागला आहे.

समाजवादी पक्षाने याला विरोध दर्शवला असून मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात घुसून सपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. आगामी राजकारणाच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून ही खेळी सुरु असल्याचा आरोप सपाने केला आहे. दरम्यान, योगींनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कुंभ मेळ्याची तयारी समाधानकारक पद्धतीने सुरु असून सरकार ३० नोव्हेंबरपूर्वी सर्व कामे पूर्ण करेल. कुंभमेळ्यासाठी १ लाख २२ हजार शौचालये तयार केली जाणार आहेत. कुंभमेळ्यादरम्यान लोकांना स्वच्छ भारतचा संदेश दिला जाणार आहे. कुंभमेळ्याच्या प्राधिकरणाचे नाव यापूर्वीच प्रयागराज झाले आहे. त्यामुळे आता लवकरच अलाहाबाद जिल्ह्याचे नावही प्रयागराज होईल.

या कुंभमेळ्यासाठी २४४६ कोटी रुपयांच्या ६४३ योजनांना मंजूरी देण्यात आली आहे. प्रत्येक कामाचा कालावधीही निश्चित झाला आहे. या बैठकीत आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी, मुख्य न्यायाधीश डी. बी. भोसले, मुख्य सचिव अनुपचंद्र पांडेय, कॅबिनेट मंत्री सुरेश खन्ना, डॉ. रीता बहुगुणा जोशी, नंद गोपाल गुप्ता नंदी, ब्रिजेश पाठक आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The city of allahabad in uttar pradesh is now known as prayagraj
First published on: 14-10-2018 at 20:11 IST