पीटीआय, बंगळुरू : ISRO’s Chandrayaan-3 Moon चंद्रयान-३ मोहिमेतील ‘प्रज्ञान’ रोव्हर ‘विक्रम’वरून बाहेर पडला असून त्याने दक्षिण ध्रुवावरील चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास सुरू केला आहे. लँडर आणि रोव्हरवरील सर्व यंत्रणा सुरळित सुरू असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) जाहीर केले. चंद्रावरील एक दिवस (पृथ्वीवरील १४ दिवस) प्रज्ञानचा हा प्रवास सुरू राहणार असला, तरी तेथील दुसरा दिवस उजाडल्यावरही तो पुन्हा काम करेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
‘चंद्रयान ३चा रोव्हर : भारतात तयार झालेला, चंद्रासाठी बनलेला ! चंद्रयान-३चा रोव्हर लँडरमधून चंद्रावर उतरला आहे. भारताची पावले चंद्रावर पडली आहेत,’ असे इस्रोच्या अधिकृत ‘एक्स’ समाजमाध्यमाच्या अधिकृत खात्यावरून गुरूवारी सकाळी जाहीर करण्यात आले. विक्रम आणि प्रज्ञानवर असलेल्या उपकरणांच्या आधारे चंद्रावरील माती, खनिजे आदीचा अभ्यास केला जाईल. चंद्रावरील एक दिवस दोघे सक्रीय राहणार असले, तरी त्यानंतर पृथ्वीवरील १४ दिवसांनी चंद्रावर पुन्हा दिवस उजाडल्यानंतर लँडर आणि रोव्हर पुन्हा सक्रीय होतील, अशी ‘इस्रो’मधील संशोधकांना अपेक्षा आहे. काही दिवसांपूर्वी इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी याचे सुतोवाच केले होते. ‘सूर्यास्त झाल्यानंतर त्या ठिकाणी मिट्ट काळोख होतो आणि तापमान उणे १८० अंश सेल्सिअसपर्यंत खाली येते. या तापमानात उपकरणे टिकणे अवघड आहे. मात्र ती टिकली, तर आणखी १४ दिवसांनी दिवस उजाडल्यानंतर पुन्हा एकदा प्रज्ञान आपली मोहीम सुरू करू शकेल,’ असे ते म्हणाले होते. गुरूवारी या मोहिमेशी संबंधित संशोधकांनी याला दुजोरा दिला.
चीनच्या ‘युटु-२’ वेगळय़ा मार्गावर
चीनच्या मोहिमेतील ‘युटू-२’ हा रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर असून २०१९पासून तो कार्यरत आहे. रात्र झाल्यानंतर तो बंद होतो आणि दिवस उजाडल्यावर सौरऊर्जेच्या मदतीने पुन्हा आपले काम सुरू करतो. मात्र हा रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवापासून ४० अंशांवर असून त्याचा टप्पा दक्षिण ध्रुवापर्यंत नाही. युटु-२ आणि प्रज्ञान यांचे मार्गही भिन्न असल्यामुळे ते एकमेकांच्या वाटेत येण्याची किंवा टक्कर होण्याची शक्यता नाही.