नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जवानांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी लोकसभेत तीव्र आक्षेप घेतला. भारताच्या जवानांबद्दल ‘मारहाण केल्याची’ (पिटाई) भाषा वापरणे ही जवानांची अवहेलना असल्याचे सडेतोड प्रत्युत्तर जयशंकर यांनी दिले.

भारत जोडो यात्रेत राजस्थानात जयपूरमधील जाहीरसभेत राहुल गांधी यांनी, भारतीय जवानांना चिनी सैनिक मारहाण करत आहेत, पण, केंद्रातील मोदी सरकार झोपले असल्याचा आरोप केला होता. या विधानाचा संदर्भ देत जयशंकर यांनी, राहुल गांधी यांचे नाव न घेता टीका केली. ‘राजकीय मतभेद असू शकतात, राजकीय टीका-टिप्पणीही होऊ शकते. या गोष्टी मला मान्य आहेत. काहींनी तर राजकीय शहाणपण वाढवले पाहिजे असा सल्लाही मला दिला आहे. त्यांचे म्हणणे मी ऐकून घेऊ शकतो. हे सल्ले मला कोण देत आहे, हे मला माहिती आहे, सल्ले देणाऱ्यांबद्दल मी आदरच बाळगतो, अशी मिश्किल टिप्पणी एस. जयशंकर यांनी केली. ‘जयशंकर यांनी चीनसंदर्भातील आपले ज्ञान वाढवले पाहिजे’, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते.

भारताच्या जवानांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष टीका करणे योग्य नव्हे. आपले जवान अरुणाचल प्रदेशमधील तवांग सेक्टरच्या यांगत्से भागांत जीवाची पर्वा न करता देशाच्या सीमांची सुरक्षा करत आहेत. यांगत्से समुद्रसपाटीपासून १३ हजार फुटांवर असून तिथे प्रतिकुल परिस्थिती तैनात असलेल्या जवानांबद्दल त्यांना मारहाण झाली, असा शब्दप्रयोग करणे उचित नव्हे. जवानांचा आदर केला पाहिजे, सीमांच्या रक्षणासाठी ते बजावत असलेल्या कर्तव्याबद्दल त्यांचा सन्मान केला पाहिजे, असे  जयशंकर म्हणाले.

चीनच्या घडामोडींसदर्भात केंद्र सरकारला चिंताच नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल. केंद्र सरकारने  सीमांवर अतिरिक्त जवान का पाठवले, प्रत्यक्ष ताबा रेषेवर शस्त्रसंधी करण्यासाठी चीनवर दबाव का आणला, चीनशी असलेले संबंध तणावपूर्ण आहेत, असे केंद्र सरकार जाहीरपणे का म्हणत आहे, असे सवाल त्यांनी केले.