लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. अशात भाजपाने निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. नागपूरमध्ये झालेल्या भायुमोच्या संमेलनात नितीन गडकरींनी काँग्रेसवर टीकेची तोफ डागली आहे. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातलं सरकार आंधळं, बहिरं आणि मुकं होतं अशी टीका त्यांनी केली आहे.
काय म्हणाले नितीन गडकरी?
“१९४७ ला पंडित नेहरू हे देशाचे पंतप्रधान झाले. त्यांनी गरीबी हटवणार म्हटलं होतं. त्यानंतर इंदिरा गांधींनी गरीबी हटाव हा नारा दिला. त्यावेळी गरिबी हटली नाही. त्यानंतर राजीव गांधी आले, त्यांनीही हाच नारा दिला होता. त्यांच्यानंतर सोनिया गांधींच्या नेतृत्वात मनमोहन सिंग आले त्यांनीही हाच नारा दिला. एक असं सरकार दिल्लीत होतं, ज्या सरकारला डोळे होते पण दिसत नव्हतं, तोंड होतं पण बोलू शकत नव्हतं, कान होते पण ऐकू शकत नाही. मनमोहन सिंग सरकार हे मुकं, बहिरं आणि आंधळं होतं.” अशी टीका गडकरींनी केली आहे.
नितीन गडकरींकडून मोदी सरकारचं कौतुक
नमो रोजगाराच्या माध्यमातून नितीन गडकरी यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळाचं कौतुक आहे. मोदी सरकारला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. काँग्रेसच्या कार्यकाळाचे ६५ वर्षे आणि मोदींनी १० वर्षांत केलेला विकास याची तुलना करुन बघा. तुम्हाला कळेल मागच्या दहा वर्षांत उत्तम काम झालं आहे. हायवे, रस्ते, पोर्ट सगळ्या ठिकाणी तुम्हाला बदल दिसेल. नीती आयोगाने त्यांच्या अहवालात म्हटलं आहे की २५ टक्के गरीब हे दारिद्र्यरेषेच्या बाहेर आले आहे. साडेचार कोटी लोकांनी बँकेत खातं उघडलं आहे. आपल्या युवकांना माहीत असेल आम्ही जेव्हा मिहान प्रकल्प आणला तेव्हा शरद पवार आणि काँग्रेस या प्रकल्पाला विरोध दर्शवत होते. मात्र मिहानमध्ये आता विदेशी गुंतवणूक झाली आहे. आता ६८ हजार लोकांना रोजगार मिळाला आहे.
आत्मनिर्भर भारताच्या दिशेनेच आपली वाटचाल
युवकाच्या हाताला काम, शेतकरी कल्याण, उत्तम रुग्णालयं, उत्तम विद्यापीठं, उत्तम मार्ग, उत्तम शाळा या सगळ्या आम्ही उभ्या करत आहोत. सबका साथ सबका विकास या मंत्रानेच आम्ही पुढे चाललो आहोत. आज विदर्भात शेतकरी आत्महत्या करत नाहीत. कारण आपल्या सरकारने इथले बंद पडलेले सिंचन प्रकल्प आपण सुरु केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हे स्पष्ट केलं आहे की आपल्याला आत्मनिर्भर व्हायचं आहे. सध्या आपली वाटचाल त्याच दिशेने सुरु आहे असंही गडकरी आपल्या भाषणात म्हणाले. तसंच मोदी सरकारचं कौतुक केलं आहे.