जगात करोना महामारीची तिसरी लाट सुरू झालेली आहे. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत तर करोनाचा अक्षरशा विस्फोट झाल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वाधिक करोनाबाधितांसह सर्वाधिक रूग्णांच्या मृत्यू संख्येमुळे अमेरिका सर्वाधिक प्रभावित देश ठरला आहे. जो की जागतिक रूग्णसंख्येच्या २० टक्के आहे. तर जगातिक मृत्यू दर १५ टक्क्यांवर पोहचण्यास देखील अमेरिका मोठ्याप्रमाणावर जबाबदार आहे.
जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार युनायटेड स्टेट्समधील कोविड-19 प्रकरणांची एकूण संख्या रविवारी ६० दशलक्षांच्या पुढे गेली आणि जानेवारी २०२० पासून यूएसमध्ये किमान ८३७५९४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
९ नोव्हेंबर २०२० रोजी, अमेरिकेतील कोविड-19 केसेसच्या संख्येने १० दशलक्षाच टप्पा ओलांडला होता. त्यानंतर २४ मार्च रोजी ३० दशलक्ष, ६ सप्टेबंर रोजी ४० दशलक्ष आणि १३ डिसेंबर रोजी ५० दशलक्षचा टप्पा ओलांडला गेला होता. अशी माहिती वृत्तसंस्थेकडून मिळाली आहे.
एवढच नाही तर अमेरिकेचे संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांना देखील करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे त्यांचे संपूर्ण लसीकरण होऊन त्यांनी बुस्टर डोस देखील घेतलेला आहे. असे असतानाही त्यांना करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. तसेच, सध्या वाढत्या संसर्गामुळे विमानाची उड्डाणे रद्द झाली आहेत, शाळा आणि कार्यालये बंद आहेत, रूग्णालयांवरील भार वाढला आहे.