चीनमध्ये मोठ्या प्रमाणवार करोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यामुळे जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतानेही अधिक सतर्क होते, काही उपाययोजनाबाबत विचार सुरू केला आहे. शिवाय, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना पत्र लिहिलं आहे. चीनमध्ये वाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर भारतात नियमांचं पालन होत नसेल, तर काँग्रेसची भारत जोडो यात्रा स्थगित करावी, असं केंद्राने काँग्रेसला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. यात मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आत्यावश्यक असल्याचंही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं आहे. यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झाल्याचं दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“राजस्थानमध्ये भारत जोडो यात्रा २१ डिसेंबर रोजी सकाळी संपली, पण या ठिकाणी झालेल्या प्रचंड गर्दीने भाजपा व मोदी सरकार एवढे घाबरले आहे की केंद्रीय आरोग्यमंत्री २० डिसेंबर रोजी राहुल गांधींना राजस्थानमध्ये कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याबाबत पत्र पाठवत आहेत.” असं राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मांडीवीय यांनी पाठवलेल्या पत्राच्या पार्श्वभूमीवर ट्वीटद्वारे म्हटलं आहे.

याशिवाय, “हे स्पष्ट दिसते की भाजपाचा उद्देश जनतेच्या वाढत्या पाठिंब्याला घाबरून भारत जोडो यात्रेमध्ये अडथला निर्माण करण्याचा आहे. दोन दिवस अगोदरच पंतप्रधानांनी त्रिपुरामध्ये रॅली केली होती, जिथे कोणत्याही कोविड प्रोटोकॉलचे पालन झाले नाही. कोविडच्या दुसऱ्या लाटेत पंतप्रधान मोदींनी बंगालमध्ये मोठ्या सभा घेतल्या होत्या.” याची आठवणी गेहलोत यांनी करून दिली.

याचबरोबर, “जर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा उद्देश राजकीय नसून त्यांची चिंता स्वाभाविक आहे, तर त्यांनी सर्वात पहिले पंतप्रधानांना पत्र लिहायला हवे होते.” असा टोलाही अशोक गेहलोत यांनी लगावल्याचं दिसत आहे.

चीनसह जपान, दक्षिण कोरिया, ब्राझील आणि अमेरिकेत करोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर करोना विषाणुतील नव्या उत्परिवर्तनाची माहिती मिळवण्यासाठी दैनंदिन करोना चाचण्यांत आढळलेल्या नमुन्यांचे संपूर्ण जनुकीय क्रमनिर्धारण (जिनोम सिक्वेन्सिंग) करण्याची सूचना सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारने मंगळवारी केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Then he should have written a letter to the prime minister first ashok gehlots statement on the union health ministers letter msr
First published on: 21-12-2022 at 14:34 IST