मैतेई आरक्षण मुद्दय़ावर उच्च न्यायालयाची केंद्र, राज्याला नोटीस

पीटीआय, नवी दिल्ली, इम्फाळ

मणिपूरच्या स्थितीबद्दल सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात वेगवेगळय़ा याचिकांवर मंगळवारी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने कुकी जमातीला लष्करी संरक्षणाची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला. तर मणिपूर उच्च न्यायालयाने मैतेई आरक्षण मुद्दय़ावरील फेरयाचिकेवरून केंद्र सरकार आणि राज्य सरकारला नोटीस बजावली.

मणिपूरमध्ये कुकी आदिवासी जमातीला लष्करी संरक्षण द्यावे अशी मागणी करणारी याचिका मणिपूर ट्रायबल फोरम या स्वयंसेवी संस्थेने दाखल केली आहे. केंद्र सरकार आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एकत्रितपणे जातीय कार्यक्रम राबवत असून राज्यातून कुकी आदिवासी जमातीचा संपूर्ण खात्मा करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे असा गंभीर आरोप या संस्थेने केला आहे.

मात्र, सध्या मणिपूरमध्ये सुरक्षा संस्था कार्यरत आहेत असे सांगून महान्यायअभिकर्ता तुषार मेहता यांनी याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास विरोध केला. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असून प्रशासनाने तो हाताळला पाहिजे असे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले. आम्ही यामध्ये हस्तक्षेप केल्यास परिस्थिती अधिक चिघळेल असे निरीक्षण न्या. सूर्य कांत आणि न्या. एम एम सुंद्रेश यांच्या उन्हाळी सुट्टीतील खंडपीठाने नोंदवले. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या पोकळ आश्वासनांवर विश्वास ठेवू नये आणि कुकी जमातीला लष्करी संरक्षण द्यावे अशी विनंती फोरमने केली. पुढील सुनावणी ३ जुलैला होणार आहे.

दुसरीकडे, मैतेई आरक्षणाच्या मुद्दय़ावरून दाखल करण्यात आलेल्या फेरयाचिकेवरून मणिपूर उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारला नोटीस बजावली. मैतेई समुदायाचा समावेश अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये करण्याची शिफारस करणाऱ्या न्यायालयाच्या २७ मार्चच्या आदेशात बदल करावेत अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे,

मर्यादित इंटरनेट सेवा देण्याचे निर्देश

मणिूपर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला काही निर्दिष्ट ठिकाणी मर्यादित इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. राज्यात ३ मेपासून इंटरनेट सेवा बंद आहे. लोकांना तातडीचे आणि आवश्यक काम करण्यासाठी, विशेषत: विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले.

चार संशयित अतिरेक्यांना अटक

युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (यूएनएलएफ) या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या चार संशयित अतिरेक्यांना मंगळवारी पोलिसांनी अटक केली. लष्कराकडून ही माहिती देण्यात आली. त्यांच्याकडून एक ५१ मिमीची लहान तोफ, बाँब अशी हत्यारे ताब्यात घेण्यात आली.