Donald Trump Nobel Peace Prize: पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव २०२६ चा नोबेल शांतता पुरस्कारासाठी सुचवले. भारत-पाकिस्तानमधील संघर्ष रोखण्याचे श्रेय पाकिस्तानने डोनाल्ड ट्रम्प यांना दिले आहे. यानंतर आता स्वतः ट्रम्प यांनी नोबेल पुरस्काराबाबत विधान केले आहे. भारत-पाकिस्तान, काँगो-रवांडा अशा अनेक जागतिक संघर्षात मी महत्त्वाची राजनैतिक भूमिका बजावली असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. या कामगिरीमुळे मला याआधीच ४-५ वेळा हा पुरस्कार मिळायला हवा होता, असे विधान ट्रम्प यांनी केले.
माध्यमांनी ट्रम्प यांना नोबेल पुरस्कारासंबंधी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “खरंतर रंवाडा, काँगो यासाठी मला नोबेल मिळायला हवे होते. तसेच सर्बिया, कोसोवो यांचा संघर्ष थांबविण्यात माझी महत्त्वाची भूमिका होती. भारत आणि पाकिस्तान हा तर मोठा संघर्ष होता. त्यामुळे मला चार ते पाच वेळा नोबेल पुरस्कार मिळायला हवा होता.”
ते फक्त लिबरल लोकांना पुरस्कार देतात
दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी ते नोबेल पुरस्कारासाठी कसे पात्र आहेत, हे सांगितले असले तरी त्यांना नोबेल मिळणार नाही, असेही ते म्हणाले. मी जागतिक पातळीवर अनेक देशांमधील संघर्ष थांबवला असला तरी मला नोबेल मिळणार नाही. कारण ते फक्त लिबरल (उदारमतवादी) लोकांना पुरस्कार देतात, अशी टीका ट्रम्प यांनी केली.
पाकिस्तानच्या सरकारने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना २०२६ चा नोबेल शांतता पुरस्कार मिळावा यासाठी अधिकृतपणे त्यांचे नाव सुचवले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऑपरेशन सिंदूरनंतर संघर्ष उद्भवला होता. या संघर्षादरम्यान निर्णायक अशी राजनैतिक भूमिका घेत हस्तक्षेप केल्याचे कारण पाकिस्तानने पुढे केले आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, “भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षादरम्यान ट्रम्प यांनी निर्णायक भूमिका घेत राजनैतिक हस्तक्षेप केला. यासाठी त्यांना २०२६ मध्ये नोबेल शांतता पुरस्कारा दिला गेला पाहिजे.”
दरम्यान शनिवारी ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ या सोशल मीडिया अकाऊंटवर एक दीर्घ पोस्ट लिहून नोबेलविषयी भाष्य केले आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी वर उल्लेख केलेल्या देशांचा उल्लेख करून मी काहीही केले तरी मला नोबेल मिळणार नाही, असा पुनरुच्चार केला. “मध्य पूर्वेत शांतता प्रस्थापित करण्यासाठी अब्राहम करार केला, त्याबद्दलही मला पुरस्कार दिला जाणार नाही. रशिया-युक्रेन, इस्रायल-इराण यांच्या संघर्षात मी काहीही केले, त्याचे परिणाम काहीही असले तरी मला नोबेल पुरस्कार दिला जाणार नाही. पण लोकांना याची पूर्ण कल्पना आहे. हेच माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे”, अशी ट्रम्प यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.