देशातील करोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत असलं, तरी राजधानी दिल्लीत भीती गडद होताना दिसत आहे. दिल्लीत करोनाची तिसरी लाट सुरू झाली आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली. दिल्लीतील करोना परिस्थितीची केजरीवाल यांनी माहिती दिली.

दिल्लीत मागील काही दिवसांपासून पुन्हा करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णसंख्येविषयी केजरीवाल यांनी माहिती दिली. “दिल्लीत करोनाच्या संख्येनं पुन्हा एकदा उसळी घेतल्याचं दिसत आहे. माझ्या मते आपण याला तिसरी लाट म्हणून शकतो. आम्ही सातत्यानं परिस्थितीवर नजर ठेवून आहोत आणि घाबरण्याची गरज नाही. आवश्यक ती सर्व पाऊलं आम्ही टाकणार आहोत,” असं केजरीवाल म्हणाले.

“दिल्लीत अचानक रुग्णसंख्येत वाढ झाल्याचं दिसून आलं. दिल्लीत मंगळवारी दिवसभरात तब्बल ६ हजार रुग्ण आढळून आले होते. दिल्लीत प्रथमच इतकी मोठी रुग्णसंख्या नोंदवली गेली. मागील पाच दिवसांपासून दिल्लीत ५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. “करोना रुग्णांवर उपचारासाठी दिल्लीत पुरेसे बेड आहेत. काही खासगी रुग्णालयात आयसीयू बेडची संख्या कमी आहे, ती एकदोन दिवसात सोडवली जाईल,” असं केजरीवाल म्हणाले.

“रुग्णालयांमध्ये बेडची कमी जाणवणार नाही, यादृष्टीन सरकार तयारी करत आहे. खासगी रुग्णालयातील ८० टक्के आयसीयू बेड करोना रुग्णांसाठी आरक्षित करण्यास मनाई करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत,” अशी माहितीही केजरीवाल यांनी दिली.